Abstract – Krushna Leela
अब्स्ट्रॅक्ट / कृष्ण लीला…
त्या चित्रप्रदर्शनातल्या प्रत्येक फ्रेममध्ये मी हरवून जात होतो. रंग, रेखा, मांडणी, याच्याही पलीकडे जाऊन गुरफटत होतो. विषय होता “कृष्ण”!!! श्रीकृष्णाची अनेक रुपं त्या चित्रकारानं चितारली होती. ज्यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू कॅन्व्हासवर जिवंत झाल्यासारखे वाटत होते. मुळात श्रीकृष्ण ही व्यक्तिरेखा मला नेहमीच भुरळ घालणारी वाटत आली आहे. कारण जितकं जवळ जावं तितकं अधिक गहन होत जाणारं ते कॊडं ! एखाद्याला प्रश्न पडावा, की यातलं खरं काय? प्रत्येक चित्राशी थांबून माझी खात्री होत होती की मला त्याचं सर्वात भावणारं रुप बहुतेक हेच आहे. पण पुढच्या चित्राकडे वळताच माझं मत बदलत होतं. कळेना त्याचं खरं रुप कोणतं? खोड्या करणारं खट्याळ! जे सूरदासांना भावलं? की निरागस,भावुक,नटखट! गोपींची वस्त्रे लपवणारं शृंगाररसात भिजलेलं जे राधेला भावलं? की अत्यंत कुशल राजकारणी! जे भिष्माचार्यांनी ओळखलं? की महान तत्वज्ञ! जे अर्जुनाला दिसलं? की अनन्य साधारण भक्तिरसात चिंब होऊन भवतालात भरुन राहिलेलं! ज्यात मीराबाईला विलीन व्हावंसं वाटलं?
एकाच कसलेल्या अभिनेत्यानं वेगवेगळ्या भूमिका इतकं समरस होऊन साकाराव्या की पाहणा-याला त्या त्या वेळी तो तसा तसा वाटावा. पण त्यापलीकडे या सा-या भूमिकांच्या पलीकडचा मूळ तो कसा आहे हे गूढच रहावं तसंच काहीसं. ती सारी चित्र डोळ्यात साठवून प्रदर्शनातून बाहेर पडलो. तो नेमका कसा असावा? डोक्यात विचारांचा गुंता भिरभिरु लागला. उत्तर काही सापडेना. आणि मग हा गुंता काव्याकार घेऊ लागला. जहांगीर आर्टस गॅलरीच्या पाय-या उतरतानाच ते पूर्णत्वालाही गेलं. मग त्या पाय-यांवर बसून ते टिपून काढलं. साहजिकच जहांगीर आर्टस गॅलरीच्या पाय-यांवर जन्माला येण्या़चं भाग्य त्याला लाभलं. ही देखील कृष्णलीलाच !!!!
नंदन देवकीचा तू नंदाचा शाम मुरारी
की रासातील राधेच्या मनमोहन कुंजविहारी
पाहुणा पांडवा घरचा तो दिव्य सुदर्शन धारी
की भासातील मिरेच्या तू नटनागर गिरीधारी ….?
तू रासातील राधेच्या मनमोहन कुंजविहारी
की भासातील मिरेच्या तू नटनागर गिरीधारी ….?
तू दिव्य कधी तू भव्य कधी
तू शृंगाराचे काव्य कधी
तू पार्थसारथी रणांगणातील
सार्थ सुदर्शन धारी?
की भासातील मिरेच्या तू नटनागर गिरीधारी ….?
तु रास रसिक यमुनेकाठी
अन बंधुसखा द्रौपदी साठी
मयसभेत भरल्या गहिवरला
तो भोळा शाम मुरारी
की भासातील मिरेच्या तू नटनागर गिरीधारी ….?
He comes to us in the forms we need him to be in – a baby, a toddler, a friend, a lover and then slowly He takes the form for a supreme being. The eternal one. Magnanimous. And yet He easily fills our heart and soul. How beautiful is that! How beautiful HE is!
लेख आणि कविता दोन्ही अप्रतिम! तुझी आजची कृष्ण निळाईची कविता पण एकदम मनभावन!
कृष्णाबद्दल तू जे लिहिलं आहे न मलाही काहीसा तोच अनुभव आहे ….. बुद्धी, तेज, प्रतिभा, उन्मेष सगळं सगळं म्हणजे कृष्ण! आणि एवढ्या सगळ्यात तो असून सुद्धा त्याच मूळ रूप काय हे गूढ कोडंच!
तू सुद्धा माझ्यासारखा कृष्णवेडा आहेस हे जाणून छान वाटलं