Anubhav Haach Guru

अनुभव हाच ‘गुरू’

‘गुरू’ या नावामुळं असेल कदाचित; पण बरेच जण मला “गुरू, तुझा गुरू कोण?’ असं गमतीनं विचारतात. मी आयुष्यात कुणाचा गंडा बांधलाय? कुणाचं शिष्यत्व पत्करलंय? मला ज्यानं घडवलं, तो कोण आहे? हे सारं जाणून घेण्यातही कित्येकांना रस असतो; पण माझ्या बाबतीत म्हणाल तर लहानपणी कानावरून गेलेलं समर्थांचं म्हणणं मला आठवतं –

जे जे जातीचा जो व्यापारू
ते ते त्याचे तितके गुरू
याचा पाहता विचारू
उदंड आहे!

कारण मला लहानपणापासूनच अनेक गोष्टींची आवड होती. दिसलेली प्रत्येक छान कला आपल्याला जमायला हवी, हे वेड होतं. त्यामुळं अनेक प्रसंगी बऱ्याच मंडळींनी कळत-नकळत मला घडवलंय, शिकवलंय. ज्याचा हिशेब मांडायचा झाल्यास पसारा उदंड होईल. त्यातल्या प्रत्येकाचीच भूमिका माझ्याकरिता द्रोणाचार्यांची होती, असं नाही; पण मी मात्र एकलव्याच्या तन्मयतेनं सारं वेचत आलो, साठवत आलो. खरं सांगायचं तर आयुष्यात अनुभवासारखा गुरू नाही, असं मला वाटतं. कुठलाही गुरू म्हणा, शिक्षक म्हणा “थिअरी आधी; मग प्रॅक्टिकल’ असा मार्ग स्वीकारतो; पण अनुभव हा एकमेक गुरू असा आहे, जो आधी प्रॅक्टिकल देतो. त्यामुळं थिअरी तुम्हाला घोकावीच लागत नाही, तर ती मेंदूवर कायमची कोरलीच जाते.

माझ्यासाठीदेखील केवळ सजीवच नव्हे; तर अनेक निर्जीव वस्तूंनीही अशा “गुरू’चं काम वेळोवेळी केलंय. मला वाटतं, प्रत्येक घटना तुम्हाला घडवत असते. काहीतरी अनमोल शिकवण देत असते. फक्त ते जाणून घेण्याची कुवत तुमच्यात हवी. उदाहरणच द्यायचं झालं तर, कॉलेजमध्ये असताना मित्रांसोबत पिकनिकला गेलो होतो, तेव्हाचा एक प्रसंग सांगतो. शहरापासून दूर त्या अभयारण्यात बरीच पायपीट करून नंतर पोटभर जेवण झाल्यावर गवतावरच सगळ्यांचा मस्त डोळा लागला. अचानक माझी नजर शेजारी ठेवलेल्या, मित्राच्या काकांनी आणलेल्या, डङठ कॅमेऱ्यावर पडली आणि मला मोह अनावर झाला. माझे सगळे मित्र मस्त घोरत होते. मी संधी साधली. त्या वेळी ते माझ्यासाठी स्वप्न होतं. एकतरी फोटो चटकन काढू आणि कॅमेरा पुन्हा ठेवून देऊ, म्हणून निसर्गसौंदर्य शोधू लागलो; पण आजूबाजूला नुसताच पाचोळा! कसला फोटो काढावा? तो कॅमेरा कुठं घेऊन जाण्याचीही हिंमत नव्हती. ७०-३००च्या लेन्समधून काहीच छान, सुंदर दिसेना. पिकनिकला आलेल्या मंडळींनी टाकलेला कचरा, रिकामे टिन, पाण्याच्या बाटल्या… मग मी पडल्या पडल्याच त्याला डोळा लावून पलीकडच्या रिकाम्या टिनवर तो फोकस करू लागलो आणि अचानक चमकून थांबलो. चकित झालो. अतिशय मोहक असं गवताचं फूल मला पटलावर दिसत होतं. गवताच्या सूक्ष्म फुलात इतकं सौंदर्य सामावलंय, याचा साक्षात्कार मला प्रथमच होत होता. मी कॅमेरा बाजूला केला. समोर पाहिलं, नुसत्या डोळ्यांना फक्त गवत आणि तोच कचरा दिसत होता. मी पुन्हा कॅमेऱ्याला डोळा लावला. फोकस शिफ्ट केला. फूल स्पष्ट होत गेलं. त्या फुलावर फोकस केला. कचरा, पाचोळा सारं तिथंच होतं; पण माझ्या फोकसिंगमुळं माझ्यापुरतं त्यांचं अस्तित्व धूसर होत नाहीसं झालं होतं आणि नुसत्या डोळ्यांनी पाहताना त्या कचऱ्यात न दिसणारं ते सुरेख फूल तितकंच रुबाबात डोलत होतं. मी क्लिक केलं.

हा छोटासा प्रसंग मला खूप काही शिकवून जाणारा ठरला. त्यानं मला आयुष्यात दोन अनमोल गोष्टी शिकवल्या. एक म्हणजे, आयुष्यात आनंद, सुख शोधण्यासाठी लांब जाण्याची गरज नसते. आनंदाचं मूळ तुमच्या आसपासच असतं; पण भोवतालच्या अनेक हव्या-नकोशा गरजांच्या गर्दीत ते एकाग्र होऊन शोधावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे, अनेकदा तुम्हाला आयुष्यात जे हवंय, जे साध्य करायचंय, त्याच्या अन् तुमच्या दरम्यान बऱ्याच नकोशा त्रासदायक गोष्टी येत असतात. अशा वेळी त्यांनी विचलित होऊन साधना किंवा ध्यासच सोडण्याऐवजी किंवा त्या गोष्टींच्या नावे उगाच त्रागा करण्याऐवजी तुमच्या ध्येयावर जास्त “फोकस’ केलंत तर नको असलेल्या त्या गोष्टींचं अस्तित्व तुमच्यासाठी धूसर होऊन जातं. बस्स! त्या क्षणानंतर माझ्या अगणित गुरूंच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली – “कॅमेरा’ !!!

4 replies
  1. Shilpa Khare
    Shilpa Khare says:

    वा किती छान मांडलंय अनुभव नावाच्या गुरू बद्दल! धडा देणारा हा गुरू खूप expensive असतो.
    ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणं आणि इतर नकोशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणं खरंच किती योग्य …. कॅमेऱ्याकडून मिळणारा धडा..

    Reply
  2. शिरीन कुलकर्णी
    शिरीन कुलकर्णी says:

    महत्त्वाचं काही खूप सहजतेने उलगडलंय. अनुभव सगळ्यांच्याच आसपास असतात, पण ते काय सांगतात हे समजून घेण्याची क्षमता असावी लागते. असं असतं तर सगळेच कलाकार म्हणून या ना त्या प्रकारे व्यक्त झाले असते. झपूर्झा अवस्थेत सगळे कुठे जाऊ शकतात ? ते तू करतोस, म्हणून तुला प्रश़्न विचारला जातो की तुझा गुरू कोण ?

    Reply
  3. manasi
    manasi says:

    कॅमेरा पण गुरु असू शकतो ! छान ! शिकणार्‍याला कुठेही शिकता येते हेच खरे ! मस्त ! keep up good work !

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*