Artha Leuni Pahile Akshar
अर्थ लेउनी पहिले अक्षर
अर्थ लेउनी पहिले अक्षर
कधी उमटले कळले नाही.
करी घेतला वसा न चुकला
पाउल मागे वळले नाही
सुन्न खिन्न कातर एकांती
सोबत माझी अक्षर झाले
थिजलो जेव्हा सभेत भरल्या
तिथेही धावून अक्षर आले
कुठ्ला हा अनुबंध म्हणावा?
कोडे मजहे सुटले नाही
होऊन अश्रू कधी ओघळ्ले
कधी सांत्वने घेउन आले
रणरणत्या मध्यान्ही वेडा
मेघ होऊनी भिजवून गेले
आली गेली कैक वादळे
विण नात्यांची टिकली नाही
गेली उलटुन युगे अता त्या
अनुबंधासही अंकुर फुटले
प्रश्न अताशा पडे जगाला
मी कुठला अन अक्षर कुठले
परस्परांतच असे मिसळ्लो
नुरले आता विरळे काही
किती सुंदर लिहिलंय अक्षरांबद्दल ! पाहिलं कडवं एकदम खरंय तुझ्याबाबतीत! अक्षरांशी किंवा शब्दांशी इतकं घट्ट नातं जुळायला सरस्वतीचा वरदहस्त लागतो.