Athang
अथांग
अथांग डोहासारख्या त्याच्या अस्तित्वाने
तिला अनेकदा बेचैन करुन सोडलेलं..
तिने त्याच्या प्रतलावर खळबळ निर्माण व्हावी
या आशेने अनेक दगड भिरकावले..
पण केवळ क्षणीक तरंग उठावे अन नाहिसे व्हावे
इतकेच घडले..पुन्हा डोह निर्विकार..
त्याग अथांगतेत तल्लीन होत तळाच्या दिशेने
जाणा-या दगडांचा मग तिला हेवा वाटू लागे.
आपल्या अस्तित्वाचा दगड
भिरकावून देता आला असता त्याच्या गूढ गहनतेत तर?
मग तिला जाणवत राही
रुढींच्या रेताडीत रुतलेला तिचा अंश…
तो मोकळा होइल का याचा अदमास काढायच्या प्रयत्नात
तिला जाणवला परंपरांच्या पारंब्यांनी घातलेला विळखा
तो सुटणार नाही. .आणि तोडणे तिच्या स्वभावाला धरुन नव्हते..
ती विकल झाली पण
त्याच क्षणी मेघांच्या गवाक्षातून निसटलेले किरण
तिच्या चेहऱ्यावर विसावले. दिपलेली नजर तिने खाली वळवली
अन शहारलीच..
तेजाने उजळेलं तिचं रुप डोहाच्या तळाशी निवांतपणे विसावलेलं..
अगदी तिला हवं तसंच…
त्या क्षणी ती स्वतः त्या आभासाच्या स्वाधीन करून मोकळी झाली. ..
– गुरू ठाकूर
नितांत सुंदर! समुद्र, डोह आणि मन सुद्धा अथांग! काय आणि किती दडलेले आहे याचा थांग लागू न देणारं….
ते गूढ उकलायच तर तळ गाठावा लागतो….आणि तो साधनेन साधतो.
तिचा चेहेरा नेमका गवक्षातून आलेल्या किरणांमुळे उजळला की…..
त्याच्या अंतरांगाच्या तळाशी तिचं स्वतः च प्रतिबिंब पाहून ?…
सर, ही पोस्ट वाचायची सहावी वेळ आहे. पहिल्यांदा वाचली त्यावेळी आवडली होती, दुसर्यांदा वाचली त्यावेळी त्यातली संवेदना कळली, तिसर्यांदा वाचताना त्यात स्वतः ला related करून बघितले, त्यानंतर पुन्हा वाचली तेंव्हा ती मनाला भिडली, म्हणुन परत वाचली तर माझ्याच मनातल लिहिली आहे, अशी भासली.. अणि आता तोंडपाठ झालीच आहे तरीही परत परत वाचाविशी वाटते.. स्वतःच रूप बघण्यासाठी.
ही कविता माझ्यासाठी “आरसा” बनली आहे.
Thank you so much…
Stay blessed
धन्यवाद!!! एखादी कलाकृती अशी असते. जी जितक्या वेगळ्या कोनातून पहावी तितकी वेगळी दिसत रहाते ..नव्याने पाहताना नव्याने सापडते …खरं सांगायचं तर ती बदलत नसते..तर बदलत असते पाहणाऱ्याची जाणीव ..आणि तिचं श्रेय त्या वाचकाच्या अनूभूतीला जातं.
अथांग … नितांत सुंदर.
खूप सुंदर
Toooo good sir