Avchitaa Parimalu
अवचिता परिमळू
“तुझ्या एकटेपणातून दु:खातून तुला मोकळं करणारा उदयीक सोनकिरणात न्हात येइल..पदरात सुख नांदेल..”
पहाटेचं स्वप्नं कानात घोळवत अन डोळ्यात खेळवतच ती उठली. स्नानादिक आटपून छान नवी वस्त्र लेऊन लगबगीनं त्या अनाहुताच्या स्वागताला सज्ज झाली. श्वेत अश्वावर आरूढ होउन येणाऱ्या राजकुमाराच्या कथा तिने बालपणात पेंगुळल्या डोळ्यानी तिच्या आजीच्या तोंडून ऐकल्या होत्या. आज तोच तिच्या स्वप्नळल्या डोळ्यात तरळत होता. कोण असेल? कसा असेल? काय बोलेल?
आतुरतेपोटी ती पायऱ्या चढून माडीच्या सज्जात आली. तिथुन नजर जाईल तिथवर फिरवली. सुर्याच्या कोवळ्या किरणानी दबक्या पावलांनी उतरायला सुरवात केली होती. तरी सोनेरी धुक्यात गुरफटलेलं गाव अद्याप साखरझोप विसळण्यात गुंतलं होतं. सगळे रस्ते शांत..
हुरहुर सावरत ती पुन्हा माजघरात आली. मग देवघरात शिरून देवा समोरच्या समयीत तेल घातलं. उगाचच वात वाढवली देव्हारा उजळला. हात जोडून तिने डोळे मिटले, तर डोळ्यासमोर तोच घोड्यावरचा राजकुमार. ती हवीहवीशी बेचैनी तिला एका जागी शांत राहू देत नव्हती. दाराशी रांगोळी काढावी का? त्याच्या स्वागताला? विचार पुरा होण्या आधीच शरीरानं कृती केली. रांगोळीचं तबक उचलून ती माजघरात, तिथून अोसरीवर अन तिथून प्रमुख दाराशी जाणार तोच हाळी घुमली, “माईऽऽऽ “
“झालं उजाडलं नाही तर सुरु झाले …भिक्षेकरी, वासूदेव, बैरागी, पिंगळे..जो हवा तो सोडून सारे येतील..” ती किंचित थबकली. तिला दानाचं वावडं नव्हतं, पण आज नाही. तिने मनाशी ठरवलं. इतका साजशृंगार केलाय तो केवळ त्याच्या साठी. आज हे रुप सर्वात आधी तो पहाणार. दार उघडताच केवळ तो दिसेल बाकी कुणीही नाही. तिने दार उघडलं नाही.
“ माई दार उघड…”
ती चमकली, आपण दाराआड आहोत याची चाहुल त्याला कशी लागली? की पैंजणांनी चुगली केली?
आता हा काही हलायचा नाही…ती चोरपावलांनी वळली अन अोसरी, माजघर अोलांडत पुन्हा देवघरात आली. हातातले तबक ठेवेस्तो २ वेळा भिक्षांदेही चा नारा घुमला ..
त्या ही अवस्थेत तिच्या लक्षात आलं आज खूप वर्षानी सोनचाफा फुललाय. दाराआडून आलेला तो परीमळ तिच्या पदराचं टोक धरुन धरभर पसरत इथवर आला होता.
“आता हा भिक्षेकरी जाताच आधी सोन चाफ्या खाली जायला हवं ..पण हा जाइल तर ना.” तिने डोळे मिटून चाहूल घेतली..
“ माई, तुझं काय दुखः असेल तर टाक या झोळीत…मला उशीर होतोय…”
काय म्हणाला तो???? तिने ऐकलेल्या शब्दांची जुळवाजुळव केली..त्या आतुरतेत मन मेंदू एकत्र नसतात..विभ्रम होतात म्हणे..
पुन्हा आलेली हाळी तिने नीट जुळवली..
“तुझं काय दुखः असेल तर टाक या झोळीत”
लाख विजा चमकल्या सारखं झालं तिला ..स्वप्नातले संदर्भ जुळत होते.
“तुझ्या एकटेपणातून दुःखातून तुला मोकळं करणारा सकाळच्या सोनकिरणात ….” अरे देवा.
ती उठली संभ्रमावस्थेतच पुन्हा माजघर अोसरी अंगण अोलांडत प्रमुख दाराशी आली..दार उघडावं? उघडू नये? संभ्रम घेउनच तिने दार उघडलं…सोनचाफ्याच्या सुगंधा सोबत सोन किरणानी आत प्रवेश केला…तिने समोर पाहीलं.
दारात कुणीच नव्हतं.
घराशी येणाऱी वाट जिथे वळते तिथे तिची कासावीस नजर गेली अन धुक्यात विरत त्या वळणाशी नाहीशी होणारी भगवी कफनी तेवढी तिला दिसली…सोनचाफ्याचा दरवळही आता मंद होत विरू लागल्यासारखं वाटलं म्हणून तिने नजर चाफ्यावर वळवली. सोनचाफ्यावर फुल काय साधी कळीही नव्हती.
-गुरु ठाकूर
WOW! Simply wow. Angavar kata ala.
अप्रतिम ..
हा प्रसंग वाचल्यानंतर
माझ्या डोळ्यासमोर रूख्मिणी उभी राहिली , विठ्ठलपंत परत येतील म्हणून वाट पाहणारी..
भाषा सुंदर आहे..
गोनिदांची आठवण आली…
अप्रतिम ….
या प्रसंगातून माझ्या डोळ्यासमोर रूख्मिणी उभी राहीली, विठ्ठलपंत परत येतील म्हणून वाट पाहणारी.
भाषा सुंदर आहे….
गोनिदांची आठवण झाली….
Wah, jagnyatali gallat nemakepanane mandalie.
प्रत्येक्षात झालेली अप्रत्यक्षाची भेट!
तिच्या मनाला किती चुटपुट लागली असेल..
तो कोणत्या रूपात येवून कधी काय मागेल आणि कधी काय देवून जाईल,त्याचा काही नेम नाही..
पण काहीतरी सात्विक भाव तिच्यात असतील म्हणूनच तो तिच्या दारापर्यंत आला…आणि ओझरत का असेना आपला रंग आणि गंध देवून गेला
आज दत्तजयंती चं अवचित्य साधून लिहिलंस …. दत्तगुरुच डोळ्यासमोर ठाकले.
वाटलं दुःख काहीच नाही आयुष्यात पण सुख वाटावं असं कुणी आपलं असावं हे दुःख की इच्छा ?! असो
इतकं सुंदर लिहिलं आहेस तू , नाव सार्थ आहे तुझं ” गुरू “
प्रत्यक्ष माऊली बोलले तुझ्या लेखणीतून.. नतमस्तक… एक वीज चमकून जावी न लक्ख प्रकाश पसरावा समाधानाचा.. सुख दुःखाच्या पलीकडे आहे अवचित परिमळ हा सोनचाफ्याचा..