Ayushyala Dyave Uttar
आयुष्याला द्यावे उत्तर …
संध्याकाळी सहजच चॅनल सर्फिंग करत होतो. डिस्कव्हरी चॅनलवर जीवघेण्या अपघातातून वाचलेल्या नंतर आलेल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करून पुन्हा यशाचे शिखर गाठणाऱ्या काही मंडळींवर ती डॉक्युमेंटरी होती … त्यात काही पाय गमावलेले , हात गमावलेले किंवा अन्य एखादा अवयव गामावलेले , तरीही कृत्रिम अवयव लावून पुन्हा तीच कला सादर करणारेही होते . मग त्यात काही नर्तक होते , चित्रकार होते , मॅरेथॉन धावणारे होते , ते सारं पाहून थक्क झालो आणि त्याचबरोबर माझ्यातला कवी गलबलला … आणि त्या क्षणी एक कविता कागदावर उतरली . ते शब्द होते ….
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर …
त्या साऱ्या मंडळींची जिद्द , त्यांचा तो बाणा पाहून ते शब्द आले होते . ती संपूर्ण डॉक्युमेंटरी पाहून होईपर्यंत कविताही पूर्ण झाली होती .
नेमका दोन चार दिवसांनी मला ‘ इंद्रधनू पुरस्कार ‘ जाहीर झाला . ठाण्यातल्या एका मोठ्या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक शं . ना . नवरे यांच्या हस्ते तो पुरस्कार मला देण्यात आला . त्या पुरस्काराला उत्तर देताना मी नुकतीच लिहिलेली ती कविता सादर केली . लोकांची छान दाद मिळली . कार्यक्रम संपताच शं . ना . नवरे मंचावर आले आणि मला म्हणाले , ‘ एक गोष्ट मागितली तर मिळेल का ?’ मी म्हटलं , ‘ बोला काय आज्ञा आहे ?’ तर म्हणाले , ‘ आत्ता जी कविता ऐकवलीत , तीच हवी आहे . काय शब्द लिहीले आहेत हो ! अप्रतिम ! जीवनावर याहून उत्तम भाष्य मी याआधी कधीच ऐकलं नव्हतं .’ माझ्याकरता ही मोठी दाद होती . मग लगेच एका कागदावर उतरवून ती त्यांच्या हवाली केली आणि म्हटलं , ‘ आज पहिल्यांदाच सादर केली ही कविता …’ ते म्हणाले , ‘ का ? अहो , ही कविता तुम्ही सादर करणं गरजेचं आहे . हे शब्द जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे . तेव्हा ही सादर करत चला यापुढे ..’
माझ्या आजवरच्या लोकप्रिय गाण्यांच्या जन्मकथा उलगडणाऱ्या माझ्या ‘ कसे गीत झाले ‘ या कार्यक्रमातही ती कविता मी आवर्जून सादर करतो आणि रसिकही या कवितेला भरभरून दाद देतात .
परवाच्या कार्यक्रमात मात्र निवेदिका गायिका योगिता चितळे हिने ठरल्याप्रमाणे त्या कवितेच्या संदर्भातला प्रश्न मला विचारला . कविता सुरू करणार तोच मी गोंधळलो . ‘ नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ‘ कसं म्हणू ? कारण कार्यक्रम अंधशाळेत होता . माझ्या प्रत्येक शब्दाला दाद देणारे ते रसिक दृष्टीहीन होते . त्यांच्या भावना दुखावल्या तर ?
मी भलतीच कविता म्हटली . योगिताचा गोंधळ उडाला होता . मी ती कविता विसरतोय , असं वाटून ती दर दोन गाण्यांनंतर त्या कवितेचा विषय काढत होती . अन मी भलतीच कविता म्हणून वेळ मारून नेत होतो . अखेर संधी पाहून मी हळूच तिच्या कानात माझा मुद्दा सांगितला . तिलाही तो पटला . हुशारीने सावरून घेत ती म्हणाली , ‘ आता वळूया कार्यक्रमाच्या शेवटच्या गीताकडे !’ इतक्यात एक अंध विद्यार्थिनी उठली आणि तिने फर्माईश केली , ‘ गुरू ठाकुरांना विनंती आहे की , त्यांनी त्यांची ‘ नजर रोखूनी नजरेमध्ये ‘ ही आयुष्यावरची कविता सादर करावी . मला फक्त दोनच ओळी पाठ आहेत . खूप प्रोत्साहन देतात . मला पूर्ण कविता ऐकायची आहे .’ माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले . क्षणाचाही अवलंब न करता मी सुरुवात केली …
पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना
संकटासही ठणकावूनी सांगावे ये आता बेहत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ………!!
असे जगावे
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
नको गुलामी नक्षत्रांची भिती आंधळी ता-यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
पाय असावे जमीनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना
संकटासही ठणकावुनी सांगावे ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट घेताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
Sir Salam 🙏👍 khup sunder poem aahe…. Manapasun aavdli Ani agdi manala jaun bhidli…salute guru sir…
ही कविता जेव्हा जेव्हा वाचतो ऐकतो तेव्हा तेव्हा एक अनामिक नवी उर्मी अंतरातून जन्म घेत जाते. तीचा स्त्रोत एवढा विलक्षण असतो की, आयुष्यातल्या कुठल्याही आव्हानाला सहज पेलविण्याची ताकद येते. आणि पुन्हा पुन्हा ओठातून शब्द स्फुरतात की, नजर रोखुनी नजरेमध्ये… आयुष्याला द्यावे उत्तर..
गुरू सर तुम्हास माझा सलाम…!
आणखी एक सदर कविता गुरू सरांचीच आहे.महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.
_दिपक शिंदे, पुणे.
जेव्हा जेव्हा ही कविता वाचतो तेव्हा आत्मविश्वास आणखीच बळकट होत जातो.वर्ष झालं असावं महिन्यातून एकदातरी ही कविता पुन्हा वाचवीशी वाटते आणि वाचताच मनाला एक नवीन ऊर्जा देऊन जाते.. गुरू सर आपण खरंच माझे गुरू आहात.. या कवितेसाठी पुन्हा एकदा विशेष धन्यवाद… आपला एक रसिक – अजिंक्य प्रधान
Tumchyakadun hi apeksha nahi Guru Thakur sir
काय म्हणायचंय आपल्याला ते समजलं नाही. कसली अपेक्षा नाही गुरू सरांकडून????
गुरू सर. ही कविता जेव्हा मी वाचली तेव्हा त्यात विंदा यांची कविता असा उल्लेख होता. ह्या कवितेमागची त्यांची प्रेरणा काय असावी म्हणून कुतूहलापोटी मी गुगलवर सर्च केले तेव्हा मी या ब्लॉगपाशी येऊन पोहचलो आणि कळलं की ही कविता तर तुमची.
हा खोडसाळपणा कोणी का करावा किंवा कविता वाचल्यावर त्यात कवीचे नाव नमूद नसेल म्हणून विंदा यांच्या शैलीशी जुळणारी असं मानत जर का त्यांचं नाव ज्याने कोणी लावलं असेल त्याने खातरजमा करण्याची तरी तसदी घेऊ नये का ??
काल मी सर्च kelyavar vinda chi mhanun ali. Nakki konachi kavita?
नमस्कार श्रीमती खलीदा शेख,
खाली श्री. अविनाश यांना उत्तरादाखल मी काही लिंक्स दिल्या आहेत त्या वाचून आपण स्वतःच ठरवावे.
सस्नेह,
गुरू ठाकूर.
जरा उशीरच झाला ह्या कवितेपर्यंत पोहोचायला. But better late than never, खूप प्रेरणादायी कविता आहे. मन:पूर्वक आभार आणि शुभेच्छा!!
ही कविता कुणाची आहे? विंदांची की गुरु ठाकूर यांची?
Namaskar Avinash,
Please visit the following URL’s (posts) under the tab “my blog”. They should help you in clearing your doubts.
https://www.guruthakur.in/ase-jagave-in-m-s-b-7th-std-syllabus/
https://www.guruthakur.in/gurus-poem-on-vinda-karandikars-name/
-Guru
Ha hi ek prakare aapla sanman ch! 🙂
मॅम तुम्ही मला ही कविता गुरू ठाकूर यांची आहे व ती कधी पब्लिश झाली याचा पुरावा दयावा व youtube व google var एकदा रिसर्च करा.नंतर मला तुमचा अभिप्राय कळवा ही विनंती..
श्री. अमोल बनसोड,
महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमात, इयत्ता सातवीच्या पुस्तकात ह्या गुरू ठाकूरच्या कवितेचा समावेश करण्यात आलाय. महाराष्ट्र स्टेट बोर्डाने रिसर्च न करताच गुरू ठाकूरांच्या नावाखाली ही कविता पब्लिश केली आहे असं तुम्हाला म्हणायचंय का?
विंदा करंदिकरांच्या कुठल्याही संग्रहात ही कविता सापडत नाही. आपण स्वतः काही रिसर्च न करता सोशल मिडीया वर कोणीतरी type केलेल्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवता याची खंत वाटते.
गुरू तुझी ही कविता म्हणजे epitome of philosophy of life!
मला आठवत नाही मी किती वेळा ही कविता वाचली असेल , प्रत्येकवेळी ती प्रेरणा देऊन जाते, आणि तुझ्या तोंडून ती ऐकणं म्हणजे दुधात साखर…… मी आतापर्यंत व्हिडिओ च पाहिला आहे, प्रत्यक्ष तुझ्यासमोर बसून ऐकायचा योग कधी येतोय पाहू.
प्रत्येकाची लिहिण्याची , व्यक्त व्हायची एक शैली एक बाज असतो, तू जसं लिहितोस न ती style च वेगळी आहे म्हणून मी म्हणते ‘गुरू’ हे नुसतं नाव नाहीये तो एक ब्रँड आहे एक अधिष्ठान आहे
सातवीच्या पाठ्यपुस्तकात तुझी ही प्रेरणादायी कविता आहे, I wish ती शिकवायची संधी मला मिळावी.
तुझी कविता इतकी प्रेरणा देऊन जाते की त्या अंध विद्यार्थिनीने मन:चक्षु नी ती वाचली आणि कानात प्राण आणून ऐकली असावी.
तुझ्या कविता तुझं नाव वगळून फेसबुक whatsapp वर फिरताना दिसली की ती पोस्ट करणाऱ्यांची मी शाळा घेते.
Truly Inspirational words.
माझी सर्वात आवडतीची कविता,
Truly inspiring!!!
अनेक ठिकाणी हि कविता कै. विंदां ची असल्याचे सांगितले जाते, सत्य काय आहे?
गुरूचा वरिल ब्लॉग आपण वाचल्यानंतरही आपल्या मनात हि शंका आली ह्याचं आश्चर्य वाटतं.
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या शालेय अभ्यासक्रमात, इयत्ता सातवीच्या पुस्तकात ह्या गुरू ठाकूरच्या कवितेचा समावेश करण्यात आलाय.
तसंच विंदा करंदिकरांच्या कुठल्याही संग्रहात हि कविता सापडत नाही.
Check
नेटवर सर्च केले असता विंदा च्या नावावर ह्या कवितेचा उल्लेख येतो.
hi kavita aanek lokanchya navane share keli aahe, pan hi kavita khari Guru Thakur Yanchi aahe