Bechaini
बेचैनी
वैशाख उतरणीला लागला की, वळवाच्या हुली सुरु होत असत.अशा वेळी दिवेलागणीला बाहेर अंधारु लागताच, घरातल्या दिव्याभोवती एखादा पाखा (पाकोळी) भिरभिरत फेर धरे. चुलीशी वेटोळं करुन बसलेलं मांजर मग त्याला मटकावण्याच्या इराद्याने घरभर उड्या मारीत धावे. तो पाखा भिंतीवर विसावला की, आजी अलगद त्याला चिमटीत पकडून बाहेर सोडी, हकनाक मांजराच्या तोंडी त्याचा जीव नको जायला इतकाच हेतू. आजोबा म्हणत मरण काय चुकलंय कुणाला? इथे एकच कारण होतं बाहेर शंभर असतील!! त्यावर आजी म्हणायची, “असेनात, पण इथे डोळ्यासमोर नको. आपल्याच्याने होईल ते आपण करावे” आजीचा हाच गुण आमच्यात नकळत उतरला. फार वर्षे झाली त्याला. तरीही बालपणीच्या कोकण मुक्कामातली ही आठवण अजून ताजी वाटते…
आजकाल शहरातल्या चकचकीत घरात दिवेही नाहीत अन् पाखेही! पण दिवेलागणीला, सूर्याचा तो लालभडक गोळा क्षितिजाने मटकावला की महागड्या लखलखाटावर मात करत, एक अगम्य बेचैनी निष्कारण त्या पाख्या सारखीच भिरभिरत अंतःकरणात शिरते. सरत्या क्षणांचे बुडते हिशेब, आशानिराशेच्या खेळातल्या बेरजा वजाबाक्या, वर्तमानाला धरून ठेवण्याची अगतिक धडपड साऱ्यांचं सार सामावलेलं असतं त्या बेचैनीत. तिला नामशेष करण्याच्या नादात मनाची त्या मांजरासारखी अवस्था होते तेव्हा वाटतं, तिला त्या पाख्यासारखं चिमटीत पकडून बाहेर सोडायचं काही तंत्र आजीकडून शिकता आलं असतं तर बरं झालं असतं..
– गुरु ठाकूर
sundar…
प्राध्यापिका लेखिका शिरीन कुळकर्णी यांची प्रतिक्रिया…….
बेचैनी खूप खोलवर जाणवली, मनात उतरली. संवेदनशील व्यक्तीला मावळता सूर्य बेचैन करतोच. म्हणून संध्याकाळ ही कातरवेळ असते. ही बेचैनी तुमच्याकडून काही विशेष आविष्कार घडवून आणील, असं वाटतं.
पाखा फार सुरेख ! तुमची आजी, हळूच तिला मिष्किलपणाचा चिमटा काढणारे तुमचे आजोबा आणि हे सारं टकमक पाहणारे छोटे तुम्ही, असं चित्र डोळ्यांसमोर आलं. किती सहजपणे आजीने केवढा मोठा संस्कार केला !
पाखा हा शब्द ही फार आवडला. दुर्गाबाई भागवतांनी बहुतेक ऋतुचक्र पुस्तकात म्हटलं होतं, जी सतत पंखावर असते ती पाकोळी ! पण या अर्थाने पाखा हा शब्द जास्त अर्थवाही आहे.
तुमची संवेदनशीलता अशीच तरल आणि उत्कट राहो आणि ती तुम्हाला सतत लिहितं ठेवो, असा मनापासून आशीर्वाद.
– शिरीन कुळकर्णी
अशी खुप तंत्र शिकायची राहून जातात आयुष्यात आणि वेळ निघुन गेल्यावर लक्षात येत काही तंत्र राहुनच गेली शिकायची.ज्यांचा कडून शिकायच असत ती पण ऩिघून गेलेली असतात.
Touching….
चिंतन आवडल्याबद्दल आणि तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनःपुर्वक आभार.
– गुरू
हे तंत्र तुम्हाला जमलं कि मलाही शिकवा.
व्वा! अप्रतिम ! अगतिकता पाचवीला पुजली आहे
अप्रतिम, संवेदनशील लेखन.
खरंच बेचैन वाटलं. खूप छान लेख
जाणवते ना अशी बेचैनी, जेंव्हा मोगर्याच अत्तर हातात घेते पण अंगणातलं ते टपोरं मोगर्याच फुल कुठेच नसत. खूप बेचैन होत मन……
खुप छान लिहिलंय… मस्त..
Indeed ❤
अप्रतिम
खूप छान लिहिलं आहेस..खूप गहिरं..
Nice.. Guru sir