Bhakti aani Prem

भक्ती आणि प्रेम

“भक्त” या शब्दात मोठी गंमत आहे. मुळात भक्त म्हणजे काय? तर जो विभक्त नाही. ’विभक्त’ म्हणजे ’Departed’ असेल तर ’भक्त’ याचा अर्थ एकरुप झालेला असा होतो. अर्थात भक्ती म्हणजे एकरुप होण्याची प्रक्रिया. एकरुप होण्याकरिता जवळ येण्याची गरज असते किंवा जवळ येणं ही एकरुप होण्याची पहिली पायरी समजू. अर्थात हे ’जवळ येणं’ म्हणजे काय? तर अंतर नाहीसं करणं. हे अंतर दोन प्रकारचं असतं. एक जे डोळ्यांना दिसतं. ज्याला ’Physical Distance’ असं म्हणतात.आणि एकरुप होण्याकरता ही दोन्ही अंतरं एकाचवेळी नाहीशी होणं गरजेचं असतं. देवळासमोरच्या रांगेतला शेवटच्या टोकाचा माणूस आणि गाभा-यातली मूर्ती यांच्यात अंतर आहे. रांग संपली, तो गाभा-यात पोहोचला. ‘Physical Distance’ कमी झालं. पण आतलं अंतर?? ज्याला ‘Inner Space’ म्हणतात. त्याचं काय? रांगेच्या शेवटच्या टोकाला येऊन तो उभा राहिला तेव्हा त्याचं साध्य होतं गाभा-यात पोचण्याचं, देवाला पाहण्याचं. तो त्या टोकाला उभा होता पण मनाने मात्र गाभा-यात होता. मग रांगेत रमला. तिथल्या लोकांशी रूळला, राजकारणावर चर्चा केली. तासभर वेळ काढता काढता अनेक चर्चा झाल्या. रांगेतला एकजण त्याचा व्यवसायबंधू निघाला, एक महत्वाचं ’Deal’ ठरलं. तासाभरात जर बाहेर पडलो तर आजच हे ’Deal’ साध्य होईल. आता तो घड्याळाकडे पाहतो. गाभा-यातल्या देवाला विनवतो, रांग संपू दे! लवकर ’Deal’ होऊ दे! ५ किलो पेढे देईन!……… साध्य बदललं !!! मघाशी त्याचं साध्य होतं ’देव’. आता साध्य आहे ’Deal’ ! देव हे फक्त डील यशस्वी करण्याकरताचं एक साधन झालं आहे. म्हणजे शरीराने जेव्हा तो गाभा-यात पोहोचलाय तेव्हा मनाने तिथून कित्येक किलोमीटर दूर असलेल्या त्या ’Deal’च्या ठिकाणी पोहोचलाय.’Physical Distance’ संपलं पण ‘Inner Space’ ????. भेट झाली, पण भक्त आणि भगवंताची नाही कारण भक्त त्यापूर्वीच विभक्त झाला…. प्रेम आणि भक्ती यातलं हेच साम्य आहे. दोन्हीचं अंतिम रूप हे विरघळून जाणं आहे. मीपण टाकल्याशिवाय विरघळता येत नाही. मला काय हवंय हे सांगण्यापेक्षा तुला काय हवंय याचा विचार म्हणजे विरघळून जाणं! यात मी, माझं, मला रहातच नाही. इथेच प्रेम आणि भक्ती एक होते. मीरा कृष्णमय होऊन गेली. मीरेचं अस्तित्वच राहिलं नाही. ते समर्पण होतं. पण म्हणून आज मीराबाई म्हणून डोळे मिटले तर कृष्णाचं रुप डोळ्यासमोर येतं. भक्तीचा अंतिम चरण, जवळ येण्याचं अंतिम रुप म्हणजे एकरुप होणं ! प्रेमातही तेच असतं. दोन शरीरं एकत्र येतात तो “शृंगार’ असतो पण दोन मनं एकत्र येतात ते ’मीलन’ असतं. पण तरीही दोन्हीमधला ’मी’ शिल्लक असतोच. ज्याक्षणी हे दोन ’मी’ एक होतात, तो क्षण म्हणजे ’संगम’! एक विचार, एक तत्व झालं की एकरुपता येते. रांगेतल्याचं तत्व आहे ’मागणे’, गाभा-यातल्याचं तत्व आहे ’देणे’. दोन वेगळी तत्व, एकरुपता कशी येईल? भक्ती कशी साध्य होईल त्याच्या तत्वाचा स्वीकार केल्याशिवाय? तो देण्यात विश्वास ठेवतो. दीनदुबळ्यांचा, रांजल्यागांजल्यांचा आधार होतो, हाकेला धावतो. आधार मागत नाही, आधार देतो. त्या तत्वाचा स्वीकार करणं ही पहिली पायरी आहे. नाही का? तत्व एक झालं, विचार एक झाला की ’मी’ विरघळू लागेल, आणि भक्त होण्याच्या क्रियेला सुरुवात होईल. ‘Inner Space’ कमी होत जाईल. ज्याक्षणी ती ‘Inner Space’ संपली त्याक्षणी रांगेत उभं राहण्याची गरजही संपली. कुणाला भेटायला जायचं? तो आतच आलाय. काय मागायचं? मागणंच संपलंय…तत्व एक झालंय.. संगमाच्या दिशेने पडलेलं हे पहिलं पाऊल असेल………..

4 replies
  1. शिरीन कुलकर्णी
    शिरीन कुलकर्णी says:

    हे फारच सुरेख आहे.माणसामाणसातल्या नात्यातून सुद्धा जेव्हा डील निघून जाईल, तेव्हा त्यात आनंद निर्माण होईल आणि ते नातं समृद्ध होईल. मी तुझ्यासाठी हे केलं ही भावना गळून पडेल आणि आपली प्रत्येक कृती ही आपल्याला आनंद असतो म्हणून आपल्या हातून होते, हे जाणवेल. मग नात्याला निरपेक्ष रूप प्राप्त होईल.तेव्हा देवत्व आपल्याला आपल्या आतच सापडेल. एरवी तुकारामाने म्हटले आहे की
    दगडाचा देव बोलील तो कैचा
    कवण काळी वाचा फुटील त्यासी

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*