Darval
दरवळ
सिग्नलला त्याची गाडी थांबली. तरीही काळ, काम, वेगाचं गणित सोडवत धावणा-या त्याच्या मनाला रोखण्याची सिद्धी सिग्नलला प्राप्त नसल्याने ते पळत राहणार हे गृहीतच… पण त्यालाही थांबायला भाग पाडतं ते गाडीच्या काचेला टेकलेलं चिमुकलं नाक…!!.
त्यामागच्या स्वप्न साकळल्या डोळ्यातली आर्तता त्याला व्याकुळ करते. त्याने आजवर शब्दांकित केलेले कागदी दुःखांचे महामेरु आरपार चिरून टाकणारी धार असते त्या आर्ततेला…
“उद्याच्या अंधा-या पोकळीत
बेभान होऊन झोकून दे स्वतःला..
उगवता सुर्य तुझा असेल”
…असलं काहीबाही लिहिणारी त्याची कणखर लेखणीही थरारते.. रखरखत्या मध्यान्ही कोरड्या कातळावर उगवलेल्या रोपट्याचा तहानला टाहो ऐकू येतो त्या थिजल्या पापण्यांत त्याला..
तो dashboard वरली चिल्लर व नोटा उचलतो काच खाली करतो.. त्या चिमण्या निरागस डोळ्यात ओली चमक येते.. तो ते पैसे चिमण्या तळव्यावर टेकवणार तोच..”तीन रुपया जादा है… 15 का 3 बोला मैने.. ” असं म्हणून 3 रुपये अन 3 गजरे त्याच्या हातावर टेकवून ते भाबडं भावविश्व गाड्यांच्या गर्दीत दिसेनासं होतं.. मागे उरतो मोग-याचा मंद दरवळ…!! सिग्नल सुटतो.. पळणा-या गाडीत पसरत जाणा-या त्या दरवळला बिलगून असलेल्या अनेक ओल्या आठवणींत आणखी एका आठवणीची भर पडते……..
-गुरु ठाकुर
Heartwarming and beautiful. ❤️
Very nice
किती संवेदनशील आहेस तू आणि म्हणूनच काळजाला भिडणार लिहितोस
Khupach chhan
आई गं
short Film ahe .
मग मी खूपच खूष आहे