Deh aani Moh
देह आणि मोह
‘देहाला अंत असतो पण मोहाला नाही’… फकिर बोलत होता..’आजन्म मोहाचा सर्प पंचेंद्रियांतून फुत्कारत राहतो. षडरिपूंतून सळाळत राहतो.. मोह म्हणजेच न भागणारी भूक..’
’काहीतरीच काय?? कसं शक्य आहे? देह आहे म्हणून मोह आहे. भूक देहालाच लागतेना?….’ तो म्हणाला.
’ती लागते तशी भागतेही कारण ती देहाची असते.. तो जिवंत ठेवण्यापुरती.. तिला चव ढव, रंग, गंध याच्याशी देणं घेणं नसतं. ते सारे फक्त मनाचे चोचले .. जे मोहाची पैदास करतं.. आजन्म!
आणि मग त्याची ती वखवख भागवण्यासाठी उभं आयुष्य खर्ची पडतं. देह जातो पण मोह नाही, हे माणसांच्या पिढ्यांनी स्विकारलंय. म्हणून तर पिंडाला कावळा शिवावा म्हणून मृतांच्या आवडीच्या वस्तू मांडतात.. खरंतर तेव्हा देह कुठे उरलाय? तो कधीच पंचत्वात विलीन झालाय… आणि उरलाय तो मोह… कावळा होऊन.. भिरभिरत राहण्याकरता.. म्हणून म्हटलं देहाला अंत असतो पण मोहाला नाही… “फकिर बोलतच होता. .
तेवढ्यात बाहेर मृगाने सडा शिंपायला सुरवात केली मातीच्या गंधाने त्याला साद दिली.
‘ऊठ त्याला कवेत घे..’ त्याच्या आतून आदेश आला.. पण तो नेमका कुणाचा? देहाचा की मोहाचा या प्रश्नात गुरफटून तो तसाच बसून राहिला.
मातीच्या गंधाचा कवेत घेण्याचा आदेश देहाचा ! कारण देहही मातीच्याच बनलेला आणि मातीतच मिसळणार असतो ना ?