Direct Deal

डायरेक्ट डील

“आजमितीस सर्वात यशस्वी व्यवसाय कोणता?” मित्रानं भुवई उंचावत मला प्रश्न केला, तेव्हा क्षणभर मी चकितच झालो. कारण नोकरीलाच सर्वस्व मानणारा, “बिझनेस म्हणजे आपली कामं नाय रे…’ असं म्हणून गळा काढणारा हा महात्मा अचानक व्यवसायाची भाषा करतोय, हे दचकण्यासारखंच होतं.
मी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत त्यालाच प्रतिप्रश्न केला, “यशस्वी म्हणजे? तुझी यशस्वितेची व्याख्या तरी कळू दे!”

“यशस्वी म्हणजे…अक्ष्ररश: शून्यातून विश्व निर्माण करणं. धंदा सुरू झाल्यापासून घाम न गाळता अवघ्या दोन-पाच वर्षांत मूळ भांडवलाच्या दहापट उत्पन्न! याशिवाय पैसा-प्रसिद्धी सारी सुखं हात जोडून उभी! पुढच्या पाच पिढ्यांची सोय…!”

“बस्स…बस्स, आलं माझ्या लक्षात,” मी हातानंच त्याला थांबवत म्हणालो.
बराच वेळ मेंदूला ताण देऊनही मित्राच्या कल्पनेप्रमाणं असा कुठलाच यशस्वी व्यवसाय माझ्या डोळ्यासमोर येईना. पण तसं न सांगता उलट पवित्रा घेत मी त्याला म्हणालो, “अरे, असा व्यवसाय जर मला माहीत असता तर मीच नसता का तो केला? उगाच काहीतरी काल्पनिक इमले बांधू नकोस. असलं काही नसतं..कुणीतरी गंडवलंय तुला. उगाच पैसे वगैरे वाया घालवू नकोस रे बाबा..”
मित्र हसत म्हणाला, “पूर्ण अभ्यासानंतर बोलतोय मी वत्सा!!”
मग सावरून बसत भूमिकेत शिरत तो म्हणाला, “माझ्या निरीक्षणाप्रमाणं साधूगिरी! महाराज होणं, स्वामीबुवा, महंत, बाबा, योगी, सिद्धपुरुष अशी अनेक नावं प्रचलित आहेत. हा आजच्या समाजात सर्वात तेजीत चालणारा धंदा आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा बारमाही चालतो, त्यामुळं पैसा खोऱ्यानं ओढता येतो….”

“काय सांगतोस काय?”
“शप्पथ! परवा एका बॅंकेत गेलो होतो. बराच वेळ कॅश घ्यायला कुणी येईचना. काय म्हणून विचारलं, तर म्हणे जवळच कुठल्याशा तात्या, अण्णा, बापूचं मोठे शिबिर भरलंय. तो म्हणे पूर्वजन्मीची पापं धुतो. त्याचे चोख पैसे घेतो. हजारांत…लाखांत…!”
“लोक मानतात हे?”
“हो! त्याचं म्हणे डायरेक्ट डील आहे…परमेश्वराशी!!!”
“बाप रे! हा म्हणजे आध्यात्मिक धोबी घाट!” मी चकित.
“हो, पण फाइव्ह स्टार रेटचा…त्यामुळं त्या बॅंकेत रोज लाखांचा गल्ला जमतो. तो मोजायला मशिन कमी पडतात म्हणून सगळे क्लार्क पण कामाला लागलेत. त्यामुळेच बाकी लोकाना थांबवलं होतं त्यानी. कारण त्या महात्म्याचं बॅंकेशीपण डायरेक्ट डील!”
“अरे बापरे! पण माझ्या ऐकिवात तरी हे स्वामी, महाराज तर पूर्णत: निरिच्छ असतात म्हणे,” मी त्याला आपला अनुभव सांगितला.
“बरोब्बर. तीच सर्वात पहिली अन् महत्त्वाची पायरी आहे. तुम्ही निरिच्छ आहात, तुम्हाला कसलाही मोह नाही, पैसा हे विष आहे, असं तुम्हाला वाटतं. हे प्रभावीरीत्या पटवून देण्यात तुम्ही यशस्वी झालात, की मग पैशाचा ओघ तुमच्या दिशेनं वळतो. जितकं नको नको म्हणाल तितका हा पैशाचा पाऊस जास्त!” इति मित्र. हे ऐकून मला आश्चर्याचा असा धक्का बसला, की मी चकित व्हायचंही विसरलो!
माझी अवस्था पाहून मित्र म्हणाला, “अरे, हे तर काहीच नाही. मोठमोठे नेते, अभिनेते, खेळाडू दाराशी रांगा लावतात. एकदा योग्य प्रसिद्धी मिळाली, की मग नुसता खोऱ्यानं पैसा ओढायचा. बरं, या धंद्यात इन्कम टॅक्सचं लफडं मागं लागण्याची अजिबात भीती नाही. कारण, एक म्हणजे राजकारण्यांचा वरदहस्त! शिवाय सारे देणगीस्वरूप! पुढच्या पाच पिढ्यांचा उद्धार करता येतो. फक्त प्लॅनिंग हवं. बस्स, ज्याला जमलं तो जिंकला!”
“वा..!!! जबरदस्त व्यवसाय आहे बुवा !!” माझ्या तोंडातून अनावधानानं निघालं.

“पण त्याकरता अंगात काहीतरी चमत्कारी शक्ती वगैरे असावी लागते ना?” माझी भाबडी शंका.
“थांब, तुला सारं व्यवस्थित सांगतो. धंद्याची प्रथम पायरी म्हणजे भांडवल आणि ते म्हणजे एक तर तुझ्याकडं उत्तम वक्तृत्व हवं. म्हणजे मुद्दा कोणताही असो, चुकीचा वा बरोबर, तो अतिशय रसाळपणे पुराणातले दाखले देत समोरच्याला पटवून देता येण्याची हातोटी. दुसरी गोष्ट म्हणजे समोरच्यावर छाप पडेल असं व्यक्तिमत्त्व जनतेला भुरळ घालण्यासाठी. (विशेषत: स्त्रियांना; त्या आल्या की पुरुष आपोआप येतात.)
तिसरी गोष्ट, समोर आलेल्या व्यक्तीचा वीक पॉइंट चटकन ओळखण्याचं कसब.” मित्र डोळे मिचकावत म्हणाला.
“अरे, म्हणजे वक्तृत्व महत्त्वाचं. ते नसेल तर काय?” मी निराश होत विचारलं.
“चालेल” मित्रानं खांदे उडवले, “त्यावरही उपाय आहे की, सोप्पा उपाय…”
” काय? .. काय?” माझा आशाळभूत प्रश्न.

“मौन पाळायचं…! महाराज फार मोठे योगी आहेत, मोजकंच बोलतात, असं सांगणारे चतुर असिस्टंट नेमायचे. बरेचदा तुझ्या प्रसिद्धीचं कार्य हे असिस्टंटच करतात. शिवाय तुझ्या नावावर एखादा चमत्कार अधूनमधून प्रसिद्ध करून तुझं प्रस्थ वाढवत ठेवतात. या असिस्टंटकरता किमान पात्रता अशीः समोरच्याला खरं वाटेल इतक्या सफाईनं त्याला खोटं बोलता आलं पाहिजे. दुसरं म्हणजे, अशक्य कोटीतल्या बाबीदेखील महाराजांचा चमत्कार म्हणून लोकांच्या गळी उतरवता आल्या पाहिजेत. शिवाय दोन-चार भाषा बोलता येत असतील तर एक्स्ट्रा क्वालिफिकेशन. बस्स !”
“आता आपण या महाराजांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करू या…” नवा अध्याय सुरू करण्यापूर्वी पुराणिक थांबतात; तसा मित्र थांबला. ग्लासभर पाणी ढोसून मग नव्या दमानं त्यानं सुरवात केली, “यात दोन प्रकार येतात. पहिले, बोलबच्चन, समोरच्याला गुंडाळणारे अन् दुसरे, न बोलता तंत्र-मंत्राच्या नावे गंडवणारे. तशी समोरच्याला गंडवणं ही फारशी कठीण बाब नाही. थोडा मानसशास्त्राचा अभ्यास अन् थोडं निरीक्षण… बस्स! समोर आलेल्या भक्ताला सांगायचं, वत्सा, तू सध्या फार मोठ्या अडचणीत आहेस, मी अंतर्ज्ञानानं ओळखलंय. इथंच तू अर्धी लढाई जिंकतोस!”

“…पण समोरच्याला काहीच प्रॉब्लेम नसेल तर?” मित्राला मध्येच थांबवत मी शंका उपस्थित केली.
“शक्यच नाही. कारण जसं काहीतरी आजार असल्याशिवाय आपण डॉक्टरकडं जात नाही, त्याचप्रमाणं काहीतरी अडचण असल्याखेरीज कोणी साधू-महाराजांकडं फिरकत नाही. जेव्हा आत्मविश्वास संपतो, तेव्हाच माणूस अंधविश्वासाकडं वळतो, हे लक्षात ठेव,” मित्राने माझ्या शंकेचे निरसन केले.
“हं” मला मुद्दा पटला.
“मौन पाळण्याच्या दुसऱ्या प्रकारात जास्त चंगळ असते. हे महाभाग बिनदिक्कत आपल्या भक्ताला चिमटा काढणं, थोबाडणं, सिगरेटचा चटका देणं, प्रेमानं जवळ घेणं (स्त्रिया असल्यास) असे वेगवेगळे चाळे करतात आणि त्यांचे असिस्टंट या चाळ्यांचे झकास समर्थन देतात.” एवढे बोलून मित्र थांबला.
बैठक बदलून घसा खाकरत म्हणाला, “हं, ही झाली पूर्वतयारी. आता पब्लिसिटी, जाहिरात !”
“काय?” मी उडालोच (मनात!).
“होय, जाहिरात! मित्र गांभीर्यानं म्हणाला. धंदा म्हटल्यावर जाहिरात ही आलीच! यासाठी एखादी लोकप्रिय व्यक्ती निवडावी. उदाहरणार्थ खेळाडू, अभिनेता, किंवा लोकप्रिय राजकारणी (हाच जास्त फायदेशीर!)”
“तो कशाला?” मी बुचकळ्यात.
“सांगतो ना, आपल्याकडं लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या व्यक्तीचं अनुकरण करण्याचा प्रघातच आहे. म्हणून तर साबणाच्या जाहिरातीत नट्या अन् बुटाच्या जाहिरातीत क्रिकेटपटू दिसतात. …तर आपण त्यांच्या तोंडून फक्त एवढंच वदवून घ्यायचं ः “आज मैं जो भी हूँ वो अमूक बाबा-महाराज के आशीर्वाद का चमत्कार है।”

मग आपोआप काही चॅनेलवाले तुझ्याकडं धाव घेतील. गांजलेल्या लोकांच्या डोक्यात अध्यात्माच्या उवा सोडायचं काम इथं करायचं..! मग त्यातले — टक्के लक्ष्मीपुत्र तरी तुझ्या आश्रमाच्या दारात डोकं खाजवत हजर होतात. मग सगळयात आधी एक काम करायचं…”
“काय?” माझा भाबडा प्रश्न
“सरळ बाजारात जाऊन एक खोरं विकत घ्यायचं…”
“खोरं? ते कशाला?” माझं डोकं एव्हाना भणभणू लागलं होतं.
“अरे खुळ्या, पैसे ओढायला खोरं नको का?”
मित्रानं विचारलं अन् मग आम्ही दोघंही खो खो हसत सुटलो

1 reply
  1. Shilpa Khare
    Shilpa Khare says:

    Guru किती परफेक्ट वर्णन केलंय रे बुवाबाजी व्यवसायच…..व्यवसाय कसला धंदा!
    संवादात्मक लिहिल्यामुळे वाचताना गम्मत वाटली.
    दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए म्हणतात ते खोटं नाही.
    खरंच आहे जेंव्हा आत्मविश्वास संपतो तेंव्हाच माणूस अंधश्रद्दधेकडे वळतो.
    ‘ गांजलेल्या डोक्यात अध्यात्माच्या उवा ‘ ही phrase फारच आवडली. तुला कसं सुचत रे अस लिहिण?!
    Enjoyed reading this. Stay blessed keep writing. It’s pleasure to read everything you write…

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*