Ganapati Gele Gavala
गणपती गेले गावाला..चैन पडेना आम्हाला..!!!
‘श्रीगणेशाय नम:’ अशी अक्षरं पाटीवर लिहून अक्षरओळखीचा श्रीगणेशा करायच्या कितीतरी आधीपासून मी बाप्पाच्या प्रेमात होतो. त्याच्या त्या लोभस रूपाने मला नकळत त्या वयात भुरळ घातली होती. हातात खडू घेऊन घराच्या भिंतीवर मी गिरवलेली पहिली आकृती गणपतीबाप्पाची होती.आणि केवळ तेवढ्या एका कारणाने नव्याको-या पेंट वर केलेल्या त्या रेखाटनाबद्द्ल धपाटे मिळण्या ऐवजी माझे भरभरुन कौतुक झाले होते . तेव्हापासूनच आमच्यात एक छान असं नातं जुळलंय. तो सतत माझी बाजू घेऊन माझी पाठराखण करायला माझ्यासोबत आहे असं सतत वाटत राहतं.
माझ्या आईची गणपतीवर प्रगाढ श्रद्धा. मी अतिकर्मकांड करणाऱ्यांपैकी किंवा तासन्तास रांगा लावून विशिष्ट ठिकाणीच दर्शन घेणा-यां पैकी नाही. मला माझा बाप्पा यत्र, तत्र सर्वत्र भेटतच राहतो. काही त्यांच्या बाबतच्या आख्यायिकांमुळॆ देवांची जरब वाटते,कट्टर सोवळं-ओवळं यामुळे काही देवांचा धाकही वाटतो. पण गणपती या दैवताबद्दल मात्र नेहमी आपुलकीच वाटते. यामुळेच असेल अबालवॄद्धांना त्याची ओढ वाटते अन कलाकरांना तर त्याचं जबर आकर्षण असतं. मीदेखील माझ्या उमेदीच्या काळात जे जे काही केलं त्यात गणपती होताच. चित्रकला, कॅलिग्राफी, फोटोग्राफी अशा विविध माध्यमांतून काम करताना गणरायाची ही रुपं फारच जवळची वाटली. गंमत म्हणजे गीतलेखनाला सुरुवात केल्या-केल्या चॅनलवरील एका कार्यक्रमासाठी गणेशपुराणातले काही प्रसंग गीतरुपानं लिहायचे होते. त्या निमित्ताने गणेशपुराण वाचलं. हातून जे काही काम झालं त्याला मान्यवरांनी दाद दिली. तेव्हा खरंच बाप्पा माझ्या पाठीशीच नाही तर सोबतीलाही आहे अशी खात्री मला पटली. आताही मी कोकणातल्या घरच्या गणपतीला जातो. हातात कितीही महत्वाचं काम असेल तरी मी हे जाणं चुकवत नाही. सोवळं वगैरे नेसून गणपतीची मनोभावे पूजा करतो.आणि एकच विनवतो कलवंत म्हणून जन्म दिलायस हातून उत्तम कलाकृती निर्माण होत राहू दे्त .अन पाय सदैव जमिनीवर राहू देत.बस्स.एका नाटकाकरता लिहीलेल्या नांदी करत मी लिहीलेल्या ओळींतही हीच विनवणी होती.
तू गणनायक तूच गणपती
सकल कलांचा तूच अधिपती
खेळ मांडतो रंग चढूदे..मान्य करी स्तवना..
स्वीकारी वंदना शिवसुता स्वीकारी वंदना..
या साऱ्यामुळे असेल, गणेशोत्सव हा माझा अत्यंत आवडता उत्सव. दिवाळीपेक्षाही गणशोत्सव मला खूप आवडतो. लहानपणी वडिलांबरोबर गिरगाव, लालबागला गणपतींचे देखावे, रोषणाई, गणपती बघायला जायचो. आता मात्र गणपतीचे आठ-नऊ दिवस कोकणात असल्याने मुंबईतला सार्वजनिक गणेशोत्सव मिस करतो. मुंबईतलं ते दहा दिवस प्रचंड भारुन टाकणारं वातावरण, सर्वत्र दिसणारी त्याची अगणित रुपं वेड लावंतात. लहानपणी मी अनंतचतुर्दशीला घरात दडून बसे. कारण बाप्पाचं विसर्जन ही गोष्ट मला यातनामय वाटत असे. आज ते बालवय नाही, ती निरागसताही राहिली नाही. स्वत:च्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याइतपत मी बुद्धीजीवीही झालोय. तरीही आजही विसर्जनाच्या वेळी माझे डोळे अगदी तसेच पाणावतात. असं का? या प्रश्नाचं उत्तर मात्र माझं मलाच सापडत नाही.
गुरू तुझं यश कीर्ती पाहता तू म्हणगोयस ते अगदी खरंय, बाप्पा तुझ्या पाठीशी नाही तर तुझ्या सोबत अडतो सतत , त्याचा वरदहस्त सतत तुझ्यावर आहे म्हणूनच तू करतोस ते काम फत्ते होतं, हात लावशील त्याचं सोन होत,
तुझ्या यशामागे बाप्पाची कृपा आहे ही जाण तुझ्याबद्दलचा आदर द्विगुणित करते.
ही गोष्ट खरी आहे बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेस डोळे पाणावतात, तो क्षण नकोसा वाटतो.