Hasto Havyasacha Danav

हसतो हव्यासाचा दानव!

णू गणपुले डोक्याला हात लावून हताश बसला होता.

“साहेब! काय झालं?” सहाय्यकानं विचारलं.

तो म्हणाला, “”दोन महिन्यांपूर्वी 1 तारखेला लांबचे काका वारले. माझ्या नावावर 22 लाख ठेवून गेले. गेल्या महिन्याच्या 1 तारखेला लांबची एक मावशी वारली. 30 लाखांचा फ्लॅट माझ्या नावावर करून गेली.”

“”कमाल आहे! हे म्हणजे “छप्पर फाड के’ म्हणतात, त्यातली गत झाली. मग तुम्ही इतक्या चिंताग्रस्त चेहऱ्यानं का बसलाय?”

अधिकच खिन्न होत गणू म्हणाला, “”या महिन्याची 6 तारीख उलटून गेली. अद्याप काहीच घडलेलं नाहीये रे!”

अर्थात हा झाला विनोद; पण यातला विनोदाचा भाग सोडला तर आपल्या लक्षात येईल तो मानवी स्वभाव! असलेल्या अथवा मिळालेल्या गोष्टींचा आनंद उपभोगण्यापेक्षा नसलेल्या गोष्टींकरता झुरण्यातच माणूस आपलं बरचसं आयुष्य खर्च करत असतो अन् त्याकरता धडपडताना जगायचं विसरून जातो. माझ्या एका कवितेत मी म्हटलंय….

काय नेमके हवे कळेना
किती नेमके हवे कळेना
“हवे, हवे’ची हाव सरेना
हसतो हव्यासाचा दानव
भयाण आहे खरेच वास्तव!

आपण बऱ्याचदा म्हणतो, भ्रष्टाचार वाढलाय, लोकांकडं नीतिमूल्ये राहिलेली नाहीत. सगळ्या लाचखोरांना आणि भ्रष्टाचाऱ्यांना भर चौकात फासावर लटकवायला हवं वगैरे वगैरे…पण मोह टाळणं ही वाटतं तितकी सोपी गोष्ट नाहीए महाराजा! नुसती कल्पना करा ः सहज, विनासायास पुढ्यात आलेलं एखादं नोटांचं बंडल धुडकावणं जमेल तुम्हाला?

एखाद्याची फक्त फाइल वर काढायची आहे किंवा गठ्ठ्याखाली ढकलायची आहे… बदल्यात बरेच दिवस रखडलेलं तुमचं गाडी घेण्याचं स्वप्न पुरं होणार आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? विचार करून मनापासून खरं खरं उत्तर द्या. मला नव्हे; स्वत:लाच !! आहे की नाही पैशाची जादू?

कल्पना करा, सरकारी खात्यातला एक सामान्य कारकून महागाईला तोंड देत मेटाकुटीला आला आहे. रोजच्या गरजांखेरीज त्याचीही काही स्वप्नं आहेत, आकांक्षा आहेत, पण सगळं अडतंय ते पैशामुळं! अशा वेळी एखादा महाभाग त्याच्यासमोर असं पुडकं घेऊन उभा राहिला तर? बरं, या पुडक्याच्या बदल्यात त्याला काय करायचंय? मंत्रिमहोदयांची एक अपॉइंटमेंट फिरवायची आहे किंवा गठ्ठ्याखालची एक फाईल गठ्ठ्यावर ठेवायची आहे अन् हा भ्रष्टाचार धरला तर? दोषी कुणाला ठरवायचं? कारकुनाला? लाच देणाऱ्याला? की परिस्थितीला?

आता गंमत पाहा, जर तुम्ही कारकुनाच्या जागी असाल तेव्हा म्हणाल, “लाच देणाऱ्याला! त्याने दिले म्हणून मी घेतले. लक्ष्मी नाकारणार कशी?’

जर देणाऱ्याच्या जागी असाल तर म्हणाल, “कारकुनाचाच दोष आहे, सरकारी कार्यालयात घेतातच! शेवटी मला माझं काम होणं महत्त्वाचं!’

अर्थात दोन्ही भूमिकांमध्ये ती ती व्यक्ती सगळं खापर परिस्थितीच्या माथी मारून मोकळी होते.

पण परिस्थिती ही केवळ एक कातडीबचाऊ पळवाट असते. तिच्या नावे खापर फोडून आपण एखाद्याला माफ करूच शकत नाही. कारण जाहिरातींमधून कोट्यवधी कमावत असताना, मला सांगा, अशी कोणती परिस्थिती असते, जी क्रिकेटपटूंना फिक्सिंगच्या चक्रात ओढू शकते? मंत्रिमंडळात मोठमोठ्या हुद्द्यांवर विराजमान असताना अन् राष्ट्राची अब्रू, हित, संरक्षण आपल्या हातात आहे, हे माहीत असताना अशी कोणती परिस्थिती असू शकते, जी त्यांना कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करण्यासाठी भाग पाडू शकते?

बिलं नुसती दुसऱ्याच्या नावावर फाडून पळवाट शोधता येत नाही. कारण काही वेळा परिस्थितीपेक्षा कर्तव्य मोठं असतं. कोट्यवधी जनतेने ज्या विश्वासानं तुम्हाला त्या पदावर, त्या अधिकारावर बसवलं, तो विश्वास जास्त महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्हाला आपल्या कर्तव्याचा आणि जनतेने टाकलेल्या त्या विश्वासाचा विसर पडतो, तेव्हा तुम्ही हतबल नसता तर नालायक असता, त्या अधिकारासठी, त्या पदासाठी! गोष्ट फक्त त्यांचीच नाही; तर आपल्यापैकी प्रत्येकाचीच आहे. थोड्याशा मोहाला बळी पडून आपण जेव्हा या भ्रष्टाचाराच्या दुष्टचक्रात गुरफटत जातो, तेव्हा एक जबाबदार नागरिक म्हणून आपलीही काही कर्तव्यं आहेत, तत्त्वं आहेत, ती आपण पायदळी तुडवतोय, पर्यायानं आपल्याकरताच एक मोठ्ठा खड्डा खणतोय, याची जाणीवही आपल्याला होत नाही. कारण तुमच्या-आमच्या आत जन्माला आलेला असतो एक हव्यासाचा राक्षस! हा राक्षस जेव्हा एखाद्याच्या आत शिरतो, तेव्हा तो वखवखल्यासारखा तुमच्या-आमच्यातल्या सारासार विचारांना, सद्सद्विवेकबुद्धीला गिळत सुटतो. त्याबदल्यात तुमच्यासमोर तो जी मयसभा उभी करतो, ती इतकी मोहमयी असते की, फार मोजक्या लोकांना तिच्याकडे पाठ फिरवून कर्तव्याच्या आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावरून चालणं जमतं. आजच्या या बरबटलेल्या जगात अशा मंडळींना खऱ्या अर्थानं महात्मा म्हणायला हरकत नाही. मला वाटतं, केवळ आणि केवळ याच महात्म्यांच्या इच्छाशक्तीवर हे जग अजून सुरळीत चालतंय अन् चालत राहील. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या ढोंगी बुवांच्या मठांसमोर रांगा लावण्यापेक्षा नव्या पिढीनं यांचा आदर्श ठेवला, तर उद्याच्या समाजाचं चित्र नक्कीच आशादायी असेल…!

5 replies
  1. स्नेहल
    स्नेहल says:

    कर्तव्यतत्पर आणि प्रामणिक माणसं बहुतेक वेळा प्रसिद्धिपासुन लांब राहतात आणि so called greats म्हणुन जे सतत hammer केले जातात समाजमनावर त्यांच्याकडू हव्यास glorify होतो; त्यात भर ह्या वेळ खाणारा Internet चा राक्षस, त्यामुळे संयम शिकवणं महाकठीणं आहे…..पण प्रयत्न करत रहायला हवा…एक जरी चारित्र्य घडलं तरी खुप!

    Reply
  2. Shilpa Khare
    Shilpa Khare says:

    सुंदर लेख आणि तुझी उत्तरादाखल कॉमेंट सुद्धा!
    माणसाने महत्त्वाकांक्षी असावं पण ती डोळस असावी , आपण कुठे थांबावं हे पण समजायला हवं .
    फॉर्मल आणि इन्फॉर्मल एज्युकेशन यातून कळत नकळत संस्कार हे घडत असतात, आणि या बऱ्यावाईट घटनांचे परिणाम होत असतात , एखादा घडतो एखादा वाहत जातो ….. वाहंत जाणाऱ्याला अंकुश घालण्याचं काम मात्र वेळच्या वेळी शिक्षक , पालक ,वडीलधाऱ्यांनी करायला हवं.
    तू म्हणतोय ते अगदी खरंय , सचोटी आणि प्रामाणिक पणाने वागणाऱ्या आणि राहणाऱ्या महातम्यांचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवायला हवा ….

    Reply
  3. Rucha dhavale patil
    Rucha dhavale patil says:

    Sometimes demon of thirst is exist in our house or suppose he is chairmon of our collage or chif of municipalities then what people do …? & many people follow them but not incendiarism against yet .

    Reply
  4. Rucha dhavale patil
    Rucha dhavale patil says:

    आणि जर आपल्या घरातच हव्यासाचा दानव असेल तर.. ?
    किंवा आपल्या collage चा chairman किंवा आपला नगराध्यक्षच demon of thirst असेल तर …?

    Reply
    • Guru Thakur
      Guru Thakur says:

      घरातले संस्कार, सामाजिक संस्कार आणि सामाजिक व्यवस्था लहानपणा पासून प्रत्येकाला घडवत असतात. घर, शाळा आणि समाजातील बरे-वाईट अनुभव त्यांच्या मनावर प्रभाव पाडत असतात. या प्रभावांमुळे एखाद्याच्या विचार प्रक्रिया वाईट गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्याचे मन चुकीच्या मार्गाला बदलायला प्रवृत्त करते. काही व्यक्तींना कधी थांबायचं ते कळत नाही आणि हव्यास वाढत जातो. व्यवस्थेने (system) आणि समाजाने अशा व्यक्तींना लगाम घातला पाहिजे.

      Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*