Keshiva Madiva

केशिवा sss मादिवा sss!!!

जच्या जगात मार्केटिंग शिवाय सारं फोल आहे बाबा..” बऱ्याच वर्षांनी अचानक भेटलेला माझा एक स्नेही मला पटवून देत होता. मार्केटिंग स्किल या विषयावर तो ठिकठिकाणी जाऊन व्याख्यानं देण्याचंच काम करतो आणि त्यातूनच कसा गलेलठ्ठ मोबदला मिळवतो याचीही साग्रसंगीत माहिती तो देत होता इतक्यात, “केशीवा मादीवा तुज्या नावाची रे गोडीवा ” कानाचे पडदे फाटतील इतक्या मोठ्ठ्या आवाजात हे गाणं किंचाळत एक पंधरा सोळा वर्षाचा मुलगा डब्यात शिरला. हातानं गळ्यातली हार्मोनियम वाजवत होता.

“काय त्रास आहे साला…!” माझ्या शेजारी बसलेला कपाळाला आठ्या घालत म्हणाला. रात्रीचे साडेअकरा वाजत होते. डब्यात तशी गर्दी नव्हती.साहजिकच त्याला फारसं काही मिळण्याची ही शक्यता नव्हती. तरीही वाऱ्यावर पेंगणाऱ्या एका पारशाने त्रासिक नजरेनं पहात झोपमोड करणारी ती ब्याद टळावी या हेतूने पाच रुपयाचं नाणं त्याच्या हातावर टेकवलं.

आजच्या जगात मार्केटिंग कसं महत्वाचं शस्त्र आहे हे जो मला पटवून देत होता. त्याने लगेच मुद्दा पकडला..”silly boys! मला सांगा ह्या पोरांनी हेच गाणं जर सुरात म्ह्टलं, तर त्यांना जास्त भीक नाही का मिळणार?”

कसं शक्य आहे? वर्षानुवर्षं गाणं शिकून reality show पर्यत पोहोचणाऱ्या मुलांना जिथे सूर सापडत नाही. तिथे या पोरांना कुठला सापडायला?

“पण मग शब्द तरी? जे गाणं आपण दिवसातून २०० वेळा गाणार त्याचे शब्द नीट पाठ नकोत? कसे पैसे मिळणार?…customer’s psychology ओळखायला हवी. साधं मार्केटींग टेक्निक आहे. म्हणजे इथेही मार्केट स्टडी आलाच! थकून भागून घरी जाणाऱ्या प्रवाशांना छान सुरेल असं गाणं ऐकायला मिळालं तर ते तशी बिदागीही देतील. कौतुकही करतील. हे त्याला कळायला हवं. मी नेहमी म्हणतो “तुझे आहे तुजपाशी परी तू प्रोसिजर चुकलासी” आणि याचंच नाही रे बऱ्याच जणांचा हाच घोळ असतो तो निस्तरून त्यांचं घोडं मार्गी लावण्याच काम आम्ही करतो.” मी म्हटलं,” मग याचंही घोडं मार्गी लाव की, तो तुला बिदागी नाही देऊ शकणार पण तेवढंच पुण्यकर्म होईल हातून!”

त्यालाही ते पटलं असावं त्याने कोपऱ्यात चिल्लर मोजत बसलेल्या त्या पोराला बोलावलं. म्हणाला “आवाज छान आहे तुझा. पण जरा शब्दांकडे लक्ष दे, सूर सांभाळ किती गोड होईल गाणं. तसं म्हटलंस तर मी दहा रुपये दिले असते..”

“नक्की ?”

“प्रॉमिस !” मार्केटींग महाराज म्हणाले.

दुसऱ्या क्षणी त्या पोरानं डोळे मिटले सराईतपणे गळयातल्या हार्मोनिअमवर बोटं फिरवली अन सूर लावला..”रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे…”

आम्ही दोघं थक्क झालो. गाण्यातले शब्द, त्यातली एकेक जागा तो अचूक घेत होता. हा काय चमत्कार ? एव्हाना त्या पारशानं ही डोळे उघडले होते,

“क्या बात है!” गाणं संपल्यावर आम्ही दोघांनी दहाच्या नोटा त्याच्या खिशात सरकवल्या. त्या पारशानंही त्याचं अनुकरण केलं.

“अरे सोन्या, हे इतकं चांगलं गाता येतं ना? मग बेसुर का गातोस?”

“धंद्यासाठी गावं लागतं साहेब”!

त्याच्या या वाक्यावर आम्ही दोघे उडालोच,”धंद्यासाठी म्हणजे ?”

“माझा बाप छान पेटी वाजवायचा सुरेल, आई गायची, दोघं भीक मागायची पण तुम्हाला सांगतो लोक नुसतं ऐकत बसायचे, त्यानी अजून गावं म्हणून फर्माईश करायचे, अन आपापलं स्टेशन आलं की फुटकी कवडीही न देता उतरुन जा्यचे. मी आईच्या कडेवर असल्यापासुन हे सगळं पाहिलंय. म्हणून मी हा असा फंडा शोधला.”

मी मार्केटिंग महाराजाना म्हटलं “आलं का लक्षात? याच्या या बेसूर कर्कश्श गाण्यातच त्यांचं बिझनेस स्किल लपलंय.!”

“काहीतरीच काय?” मला खुळ्यात काढ्त तो म्हणाला, “बेसूर गाण्यात कसलं आलंय बिझनेस स्किल?”

‘अरे बाबा, त्याना तू म्हणतोस तशी customer’s psychology समजलीय. कारण त्यांने ही मार्केट स्टडी केलाय.’

‘तो कसा?’

‘बघ,आता ही पोरं सुरात गायली तर लोक ऐकत बसणार, त्यानी अजून गावं म्हणून फर्माईश करणार त्यात याचा वेळ वाया जाणार शिवाय पैसे नाहीच, कारण पैसे मागायला आले की जो तो झोपेचं सोंग घेणार..खरंय की नाही?’

तो मुलगा मनापासून हसला आणि, “अगदी खरंय साहेब.”म्हणून उतरुन पुढच्या डब्यात पळाला देखील.

“पण त्याचा या कर्कश्श गाण्याशी काय संबंध?” गोंधळलेल्या मित्राने विषय अजून लावूनच धरला होता.

“अरे,त्या तुलनेत कर्कश्श गाण्याचे अनेक फायदे आहेत,मुळात हा बेसूर गाऊ लागला की झोपमोड होते. मोबाईलवर बोलणाऱ्यांना व्यत्यय होतो. कानसेनांना तर एका सुरेल गाण्याचा असा अघोरी छ्ळ ही सोसत नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही ब्याद टळावी म्हणून लोक पटापट पैसे देऊन त्याला पुढे घालवण्याचा सोप्पा मार्ग निवडतात. त्यामुळे कमीतकमी वेळात अपेक्षित धंदा करुन हा पुढच्या डब्यात जायला मोकळा.”

माझ्या या विधानावर तो थक्क झाला. “क्या बात है! कमालीचं लॉजिक आहे त्याचं. पण हे तुमच्या कसं ध्यानात आलं? तुम्ही पण एमबीए वगैरे?”

मी मानेनेच नकार दिला.

“मग नक्की तुम्ही खूप वाचत असणार..राईट?”

“हो”…मी म्हटलं.

“काय वाचता? I mean especially काय वाचायला आवड्तं?”

“परिस्थिती..आणि त्यात भरडली जाणारी माणसं…ती बरंच काही शिकवून जातात. जसं आता हा शिकवुन गेला!” तो पुढे काही विचारण्याआधी मी दाराकडे सरकलो नकळंत मला नवं ज्ञान देणारा तो “गुरु” प्लॅट्फॉर्मवर दिसेल या आशेने!!

3 replies
  1. Shilpa Khare
    Shilpa Khare says:

    खूपच सुंदर लेख. असं म्हणतात दत्तगुरूंचे 52 गुरू होते.
    गुरू तुझं लेखन, विचार आणि संस्कार इतके समृद्ध आहेत आणि वाचकांनाही ते इतकं समृद्ध करतात …….. तुझ्या लेखणीला सामर्थ्य देणारे अनेक गुरू तुला नक्कीच भेटलेत..

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*