Kojagiri 2021
2019 ची कोजागरी पौर्णिमा मला आजही आठवते.तारीख होती 13 October 2019 कोजागिरी निमित्त मी आणि राहुल रानडे “मैफिल शब्द सुरांची ” हा कार्यक्रम दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात करत होतो. गाणं सुचण्याची प्रक्रिया आणि त्याला चाल लावण्याची प्रक्रिया यावर चर्चा झाल्यानंतर राहुल रसिकप्रेक्षकांना म्हणाला , ” आपण आता गाणं नेमकं कसं सुचतं याचं प्रात्यक्षिकच पाहू, म्हणजे तुम्ही एक विषय आणि शब्द गुरूला द्यायचे आणि तो इथल्या इथे तुम्हाला गाणं लिहून दाखवेल” . रसिक अर्थातच उत्साही. त्यांनी विषय निवडला रोमॅण्टिक साँग.. दिलेल्या शब्दात मुक्त छंदात कविता लिहिणे सोपे पण गाणे ते देखीलछंद आणि वृत्त सांभाळून कारण पुढे राहुल त्याला चाल ही लावतो त्या मुळे धुवपद म्हणजे मुखडा आणि शिवाय एक कडवे असं गाणं बसवणं म्हणजे सत्वपरीक्षा . तरीदेखील रोमॅंटिक सॉंग आहे म्हटल्यावर होईल असा एक विचार डोक्यात आला तेवढ्यात प्रेक्षकातून कोणीतरी म्हणालं की आज कोजागिरी आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला जे शब्द देऊ त्यात कोजागिरीच्या रात्रीचे रोमांटिक सॉंग लिहा. इथे माझ्या पोटात गोळा आला. कारण या सगळ्या करता वेळ जास्तीत जास्त दहा मिनिटांची असते.
यावर मी काही बोलण्या आधीच राहुल म्हणाला , “हो हरकत नाही सांगा शब्द.” आणि मग रसिकांकडून शब्द येऊ लागले. आणि माझ्या लक्षात आले की रसिक हे खरेच मराठी रसिक आहेत. त्यांनी दिलेले शब्द आशय विषयाला धरुन आणि गेय होते. ते असे होते..
मिठी ,चांदणे, स्पर्श, हुरहूर, कोजागिरी,सूर,
डोळे, मधुरात्र, सागराची गाज, ओढ,रात्र,
मी शब्द कागदावर उतरवता उतरवता डोक्यात त्यांची जुळवाजुळव करत होतो.. इतक्यात कोणीतरी म्हणाला *फितूर*.. आणि मला नाहीच सापडणार असं वाटता वाटता सेलोटेपचं टोक सापडावं तसं गाणं सापडलं.. अतिशय अवघड वाटणारा पेपर त्यादिवशी पाच मिनिटातच सोडवून झाला..हेच ते गाणं.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!