Kubadi

कुबडी

‘ वेद वाचणाऱ्या पेक्षा वेदना वाचणारा ऋषितुल्य असतो. संवेदना कमालीच्या जागरुक लागतात त्या करता..तुला वेद येत नाहीत पण वेदना वाचता येतात हे अंग दुर्मिळ आहे जप’ कळत्या वयात त्याला कुणी तरी जाणतेपणानं म्हणालं होतं.

“जपून काय करू ? समोरच्याची तहान कळते अन आपली कावड रिकामी आहे हे जाणवतं तेव्हा जो क्लेश होतो त्याचं काय करू ? ”
त्याच्या या प्रश्नाचं उत्तर समोरच्यांकडे नव्हतं एवढ्याशा पोराने आपल्याला निरुत्तर केलं याची वेदना त्या जाणत्या चेहऱ्यावर उमटली याने ती देखील वाचली.

..
जपायचं नाही म्हटली तरी जाणिवेचं ते अंग त्याला जन्मापासूनच चिकटूनच होतं.

भर गर्दीच्या वेळी रेल्वेच्या स्थानकातून बाहेर पडणाऱ्या लोंढ्यात टीसीला नेमका विनातिकीट प्रवासी ओळखता येतो तशीच त्याला उत्साह माखलेल्या चेहऱ्यांमागे दडलेली वेदना ओळखण्याची कला साध्य होती…

वार्धक्याच्या खुणा लपवण्याकरता मेकपचे थर थापणाऱ्या नट्यांबद्दल वाटावी तितकीच करुणा त्याला उसन्या जल्लोषामागे अपयशाची ठुसठूस लपवणाऱ्यांबद्दल वाटे.

माणसं सतत भेदरलेली का असतात? स्वत:च आखलेल्या कुंपणात अडकून उमटलेले ओरखडे जगापासून लपवण्याचा खटाटोप का करतात?
त्यापेक्षा ती कुंपणं काढायचा किंवा त्याच्या कक्षा रुंदावायचा प्रयत्न का करत नाहीत?
असल्या प्रश्नांचे भुंगे त्याला सतावीत राहात ..

त्याला माहीत होतं, व्यवहारी माणसांकडे याची उत्तरं नक्कीच नसतील , असलीच तर समर्थनं असतील आणि समर्थन हे सर्वसमावेशक असू शकत नाही ते व्यक्तिसापेक्ष असतं. ती असते कुबडी; आणि कुबडीचं अस्त्र करता येत नाही. तसा प्रयत्न केलाच तर तोल जातो..

हा विचार केला की त्याला भोवताली अदृश्य कुबड्या सावरत चालणारे जथे दिसू लागत.
कुबडीने तोल सावरण्यापेक्षा कुबडीतच अडकून कपळमोक्ष होणारेही दिसत..

व्यवहाराच्या चौकटी ठोकताना त्यात पदराचं टोकही सापडल्यामुळे गुरफटलेली मनंदेखील त्याच्या कुतूहलाचा विषय होती. पदर सोडवत नाही अन चौकट मोडवत नाही, अशांना सुटकेचा मार्ग तरी काय सुचवावा?

पूर्वी त्याला एकच प्रश्न पडे, हे सारं आपल्यालाच का दिसतं?
पण मग एकदा त्याचं त्यालाच उत्तर सापडलं..
फार वर्षांपूर्वी कुणीतरी त्याला जाणतेपणानं सांगितलं होतं,
“तुला व्यवहार कळत नाही आणि कधी कळणारही नाही”,
तेव्हा त्याला ती उणीव वाटली होती; पण मग ध्यानात आलं, ती उणीव होती म्हणूनच ही जाणीव जिवंत राहिली..

त्याने आजूबाजूला पाहिलं. कार्यक्रमाच्या दिलेल्या वेळेनुसार आलेला तो एकटाच होता ..आताशी अदृश्य कुबड्या घेतलेले जथे हळूहळू येऊ घातले होते..

-गुरू ठाकूर

16 replies
  1. कृपा
    कृपा says:

    उणीव होती म्हणून च जाणीव जिवंत होती… वाह्
    या पेक्षा जास्त काय जगते व्यक्ती?
    या साठी च तर श्वास तुटंत नाही आणि उणीव भरून निघत नाही.
    कोणाला हवी इतर philosophy!!!! प्रश्न आणि उत्तर 👆इथेच आहे. 😊
    अप्रतिम.

    Reply
  2. Snehal
    Snehal says:

    मुखवट्यामागची वृत्ती ओळखतां येणं…..याच्यासारखा शाप नाही दुसरा आजच्या जगात…माझीही अवस्था कित्येकदा त्याच्यासारखी होते….आपल्या जाणीवांची धार आपल्यालाच जखमी करून जाते.

    Reply
  3. Amruta Pradeep Deshpande
    Amruta Pradeep Deshpande says:

    Pan pratek vedna vachta yenaryala tya dur karta yet nai…ani janivch tyacha dukhala baryachda karan bante….Devane janiv aslelyala takad nai dili ti dur karnyachi ani takad asnaryala vedna kadhi kalatch nait..

    Reply
  4. Rucha dhavale patil
    Rucha dhavale patil says:

    आधी समजले नव्हते म्हणून प्रश्न केला , “असं वाटायचं कारण काय ? ” .. पण article complete post झाल्यावर answer मिळालं …….!

    Reply
    • Guru Thakur
      Guru Thakur says:

      हो. तुम्ही पोस्ट केलेल्या प्रश्नामुळे गोंधळ झालाय हे लक्षात आलं. धन्यवाद!

      Reply
  5. Dr namita nikade
    Dr namita nikade says:

    सर… आधी वाचलं त्यावेळी वरच्या उल्लेख नव्हता.. की मीच अर्धवट वाचलं, समजत नाही

    Reply
    • Guru Thakur
      Guru Thakur says:

      बरोबर आहे तुमचं. पोस्ट करतांना अर्धवट पोस्ट केलं गेलं आणि बऱ्याच वेळानंतर ती चुक लक्षात आली.

      Reply
  6. VASANT KULKARNI
    VASANT KULKARNI says:

    पदर सोडवत नाही …….. मध्ये मोह मोह के धागे असतात ते बर्याच वेळेला काही करू देत नाही .

    तुमच्या लाख इच्छा असल्या तरी !!!! निर्णय घेण्याचे धाडस लागते.काही गोष्टी मिळवण्यासाठी काही सोडाव्या लागतात.परत

    हरवले ते गवसले का ? गवसले ते हरवले का ? आहेच.

    Reply
  7. रसिका दास्ताने
    रसिका दास्ताने says:

    खूप सुंदर. मुखवटे लावून जगलं की स्वतःचा चेहरा हरवून बसतो. यंत्रवत जगता जगता जिवंतपण निसटून जातं. आयुष्याच्या संध्याकाळी मग आपण आपल्याला हवं ते जगलोच नाही ही रुखरुख लागून राहते.

    Reply
  8. Sunil khogare
    Sunil khogare says:

    #ती_उणीव_होती_म्हणूनच _ही_जाणीव _जिवंत _राहिली….???
    अप्रतिम…
    ईश्वर करो अन ही उणीव सर्वात असो….

    Reply
  9. Rucha dhavale patil
    Rucha dhavale patil says:

    पण तुम्हाला हे असं वाटण्याचं कारण काय …….?

    Reply
  10. Dr namita nikade
    Dr namita nikade says:

    व्यावहारिक जगात स्वतःच्या सच्चेपणाच्या दोन पायावर उभं राहिलं तर कुबड्याची गरजच लागणार नाही. म्हणजे चौकटीत राहण्याची वेळ येणार नाही, त्याच्या कक्षा आपोआपच वाढत जातील. फक्त हिम्मत लागेल, तो सच्चेपणा टिकवून ठेवण्यासाठी… ती सर्वांना मिळो.

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*