Maifil Shabd Suranchi – 1 May 2019
मैफिल शब्द सुरांची (लोकमत : ३ मे २०१९)
राहुल ची एक भन्नाट कल्पना. शाळेत गणिताच्या पेपरला यायचा अगदी तसाच गोळा पोटात अनुभवता येतो आम्हाला हे करताना… दरवेळची गंमत वेगळी थरारही वेगळा अन त्या नंतरचा सुटकेचा नि:श्वासही…सगळी मदार शब्द, सुरांवर आणि रसिकांवर… १ मे २०१९ स्थळ पुणे.
उलगडली शब्दसुरांची आनंदनिर्मिती (म.टा. : ९ मे २०१९)
काही मैफिली अशा काही रंगतात की त्यांचे सुखावणारे पडसाद दीर्घकाळपर्यंत येतच राहतात. रसिकांशी संवादत होणारा हा प्रयोग ३ तास झाल्या नंतरही अजून थोडावेळ म्हणणारे, त्यांनी दिलेल्या शब्दांतून गीत लीहील्या नंतर टाळ्यांच्या गजरात स्टॅंडीग अोवेशन देणारे आणि सुरात सुर मिसळून प्रार्थना गाणारे अस्सल रसिक भेटतात तेव्हा वाटतं “ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर उपकार”
पुण्यात रंगलेल्या. मैफिलीचे सर्व श्रेय पुणेकरांच्या अस्सल रसिकतेला.
श्रोत्या शिल्पा खरे यांचे विवेचन ……
मैफिल शब्दसुरांची @ Pune 01 May 2019
मला वाटतं २०१६ साल असावं. ‘मैफिल शब्दसुरांची ‘ या कार्यक्रमाबाबत कळलं होत. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाबाबत माझ्या मनात खूप उत्सुकता होती. प्रत्येकाच्या मनातील प्रश्न कि कुठलीही कविता ,गीत कसं लिहिलं जातं ? आधी शब्द लिहिले जातात की आधी संगीताची धून तयार होते? म्हणजे चाल आधी येते कि गीत ? प्रेक्षकांकडून शब्द घेऊन त्यावर तत्क्षणी गीत किंवा कविता लिहिणे आणि लगेच तिला चाल लावून सगळ्यांनी ती एकत्र गाणे हा अनोखा अनुभव आपल्याला घेता येईल का ? आणि हा कार्यक्रम आपल्या भारतात होईल का ? काल this dream came true. किती आनंद झाला ह्या कार्यक्रमात सहभागी होताना हे शब्दात सांगणं कठीण.
‘ शब्दप्रभू ‘ गुरु ठाकूर आणि ‘संगीताचार्य’ राहुल रानडे ह्या माझ्या दोन्ही मित्रांचा हा कार्यक्रम त्यांच्या समोर बसून ऐकणं, पाहणं आणि अनुभवणं म्हणजे निव्वळ ‘माणिकांचन ‘ आणि ‘दुग्धशर्करा ‘ असा एकत्र योग… याचा आस्वाद आम्हाला घेता आला आणि माझी अनुभूती शब्दात व्यक्त कराविशी वाटली म्हणून हा लेखन प्रपंच.
गुरु आणि राहुल यांनी सांगितलेले अनुभव आणि आमच्याशी साधलेला संवाद , त्यांचे संगीत आणि कविता/गाणं तयार होतानाचा अनुभव सगळं सगळं समृद्ध करून गेलं.
धवल चांदवडकर , मुक्ता जोशी आणि रश्मी मोघे या तिघांनी राहुल आणि गुरूच्या बहारदार आणि उत्कृष्ट कलाकृतींना आपल्या सुंदर आवाजात सादर करून कार्यक्रमाची खुमारी वाढवली.
गुरु किती सहज लिहितो अगदी दहा मिनिटात कविता रचतो, किंवा राहुल पण अवघ्या दहा मिनिटात संगीत देतो अगदी ज्या कुठल्या रागात संगीत हवंय ते संगीत देतो… हे सहज सहज आलेलं नसतं ,त्यामागे त्यांचा अभ्यास, निरीक्षण, आत्मववलोकन, त्रयस्थ होऊन स्वःकडे पाहणं,परकाया प्रवेश आणि निरंतर केलेली साधना आणि रियाज असतो आणि या सर्वांच्या जोडीला हवं ते विचारांच सारथ्य … तेंव्हा येत सहज. पण ते आपल्याला दिसत नाही.
जगदीश खेबूडकरांच्या ‘सख्या रे घायाळ मी हरिणी ‘ या सुप्रसिद्ध गीताचा फक्त मुखडा कायम ठेऊन गुरुने एक पूर्णपणे नवीन लिहिलेलं गाणं आणि राहुलने दिलेलं पूर्णपणे नवीन संगीत फारच सुंदर. एखाद्या लावण्यमनोहर आणि लोकप्रिय कलाकृतीवर आधारित तेवढीच सुंदर नवीन कलाकृती तयार करणं म्हणजे अवजड शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे … आणि ते गुरु आणि राहुल दोघांनी लीलया पेललं . त्याविषयीचा त्यांचा अनुभव खरंच ऐकण्यासारखा होता. गाणं इतकं सुंदर कि काय वाणू …. जगदीश खेबूडकरांनी वापरलेले ते शब्द, त्याच तोलामोलाचे नवीन शब्द काव्यात आणि त्याच वृत्तात बसवणं आणि लँडिंग ला पुन्हा त्याच मुखड्यावर आणणं सोपं नाही , आणि पुढे राहुलने देखील अंतऱ्याला जे वेगळं संगीत देऊन पुन्हा ते चपखल समेवर आणण …. श्वास रोखून बसले होते सगळे जणं …. पण लँडिंग काय अप्रतिम ! इतक्या गाजलेल्या जुन्या गाण्याची चाल ….नवीन शब्द, नवीन चाल पण मुखड्यावर परत तशीच आणायची म्हणजे राहुलच्या शब्दात सांगायचे म्हणजे हडपसरला जाऊन परत स्वारगेटला योग्य वेळेत परत यायचं …. इतकं कठीण आहे..
गुरु नेहमी म्हणतो कि कवी हा घरातील लाडाकोडाच्या मुली सारखा असतो आणि दिलेल्या चालीवर गीत लिहिणारा गीतकार हा घरातील सूनेसारखा असतो जिला सर्वांची पथ्य आणि आवडीनिवडी पाळायच्या असतात . त्यामुळे गीतकाराला सर्व कौशल्य पणाला लावून रचना करायची असते. कार्यक्रमात हा प्रत्यय कसा आला याविषयी छान बोलले दोघे. ‘गीतकाराचा जेंव्हा कस लागतो’ …. हे काव्य जेंव्हा गुरूने वाचून दाखवलं तेंव्हा खरंच त्याच्यातल्या कवीच हळवं मन, त्याचा ‘सल’ जाणवला. निव्वळ चालीत बसत नाही म्हणून जेंव्हा मेहनतीनं बनवलेल्या गाण्यात शब्दांची काटछाट करावी लागते तेंव्हा आणि मग तेच गाणं जेंव्हा लोकप्रिय होतं किंवा त्याला बक्षीस मिळतं त्यावेळेस गीतकाराच्या भावनांचं हृदयाला भिडणारं वर्णन गुरूने केलंय …. .
कानभट चित्रपटासाठी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं जगदीश भजन आणि “सोबती आहे तुझ्या मी”, हे शिक्षणासाठी दूर जाणाऱ्या आपल्या मुलाबद्दल व्यक्त झालेल्या आईच्या भावना व्यक्त करणारं गाणं, यांचे शब्द आणि संगीत दोन्ही अप्रतिम ! आमच्यापैकी बहुतांशी पालकांची मुलं शिक्षण किंवा नोकरी निमित्त लांब गेली आहेत …. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या, आणि गाताना राहुलला देखील दाटून आलं होत. गुरूला कदाचित हे गाणं लिहिताना हळवं व्हायला झाल असेल. लहानपणीचे संस्कार आणि काही जाणिवा यांचाही विचार होतो गीतलेखन किंवा काव्य रचताना . गुरूने त्याच्या लहानपणीचा किस्सा इथे सांगितला होता.
श्रीयुत गंगाधर टिपरे ही लोकप्रिय मालिका, जी अजूनही लोकांच्या मनात घर करून आहे ती गुरूने लिहिली होती. एका अक्खा एपिसोड घाईने हवा होता तो त्याने बोरिवली स्टेशन च्या प्लॅटफॉर्म वर बसून लिहिला होता. सरस्वतीचा वरदहस्त ज्यांच्या डोक्यावर असतो त्यांची प्रतिभा असतेच अशी. त्यांना कुठेही आणि कधीही लिहायला सुचतं. “अग बाई अरेच्चा” हा चित्रपट ज्याच संवाद्लेखन आणि थिम सॉंन्ग गुरूने केलं त्यावेळचे त्याने सांगितलेले किस्से पण खूप मजा आली ऐकायला.
नटरंग हा गाजलेला चित्रपट. लोकसंगीतातील जवळ जवळ सर्व प्रकार यात आलेत आणि गुरूने ते खूपच सुंदर लिहिले आहेत. त्याला नेहमी विचारला जाणारा प्रश्न यावेळी कुणी विचारला नाही तो म्हणजे अप्सरा आली हे गाणं लिहिताना डोळ्यासमोर कोण होतं ? त्यातील गवळण, गवळणीतील प्रत्येक कडवं कसं लिहिलं गेलं , ‘आता वाजले कि बारा ‘ हे गाणं कसं लिहिलं याविषयीची गोष्ट पण खूप ऐकण्यासारखी होती. नटरंग मधील प्रत्येक गाणं गाजलं. गाणं नुसतं चांगलं लिहून चालत नाही तर त्याला संगीत चांगलं पाहिजे, आणि पार्शवगायक/गायिकेने ते तेवढ्याच ताकदीनं म्हटलं पाहिजे. या सगळ्यांचं मिळून पाचशे टक्के होतं तेंव्हा गाणं हिट होतं नुसतं माझ्या शंभर टक्क्यांनी काही होत नसतं असं प्रांजळ मत गुरूने मांडलं.
या विशेष कार्यक्रमाची अजून एक विशेषता किंवा निराळेपण जे आतापर्यंत कधीच कुणीच आणि कुठेच केलं नव्हतं ते म्हणजे रसिक प्रेक्षकांनी शब्द द्यायचे , गुरुनी लगेचच त्यावर रचना करायची आणि राहुल लगेच त्याला चाल लावणार आणि मग सगळ्यांनी मिळून ती म्हणायची. अशी कुणीतरी शब्द दिल्यावर इन्स्टंट कविता करणे, तेवढ्याच वेळात तिला इंस्टंटली चाल लावणे हे खरे प्रतिभावंतच करू जाणे. पण तो प्रत्यक्ष अनुभव घेताना अंगावर हिरवा शहारा आल्याशिवाय राहिले नाही. प्रेक्षागृहातील सर्वानीच खूप आनंद घेतला त्याचा. कानावर पडणाऱ्या संगीताच्या आणि शब्दाच्या गुंजनासोबत हृदयातही अविरत आत्मरस पाझरण्याची अनुभूती होती ती.
कार्यक्रमाची सांगता गुरु ठाकूर ने लिहिलेल्या आणि राहुल रानडे याने संगीतबद्ध केलेल्या ” डॉ प्रकाश बाबा आमटे ” या चित्रपटातील एका प्रार्थनेने झाली. “तू बुद्धी दे ” ही प्रार्थना आणि तिचं संगीत कसं झालं , ती ‘ डॉ प्रकाश बाबा आमटे ‘ या चित्रपटात कशी आली , तिचं त्या चित्रपटासाठी म्हणून लिहिलेलं दुसरं कडवं याविषयी गुरु आणि राहुल दोघांनी खूप काही सांगितलं. माझ्या अत्यंत आवडीची ही प्रार्थना तिच्या गीतकार आणि संगीतकारासमवेत म्हणण्याचा सुंदर योग जुळून आला.
हा अनुभव वर्णन करायला माझ्याकडे खरंच शब्द नाहीत. अनुभव वर्णन करता येईलही कदाचित पण अनुभूती वर्णन करणं शक्य नाही ती ज्याची त्यानं घ्यायची असते. या प्रार्थनेतील दुसरं कडवं गुरु ने खास या चित्रपटासाठी लिहिलं होतं….. ‘धमन्यातल्या रुधिरास ह्या खल भेदण्याची आस दे , सामर्थ्य ह्या शब्दास अन अर्थ ह्या जगण्यास दे ‘ गुरु सारखा शब्द-कुबेरच हे लिहू जाणे आणि राहुल सारखा संगीताचार्यच ह्या इतक्या सुंदर रचनेला सूर लावू जाणे. हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ देम.
गीतकाराच्या शब्दांना संगीताचं स्पंदन आणि कोंदण असेल आणि संगीतकारात तो जाणिवेतून नेणिवेकडे नेणारा कवी वसला असेल तरच गाणं उत्तम होतं. गुरु आणि राहुल हे असंच गीतकार आणि संगीतकार मैत्र !
राहुल ने सम्पूर्ण कार्यक्रम आम्हा सर्वांना सहभागी करत इतका छान पुढे नेला, कार्यक्रम संपूच नये असे वाटत होते. पुन्हा पार्ट टू चा अनुभव घ्यायला लवकरच भेटू असे म्हणून सर्वानी निरोप घेतला. कालच्या कार्यक्रमाचे गारुड अनेकांवर असेल अजून , माझ्यावर तर आहेच आणि अजून किती दिवस ,किती वर्ष ते राहणार आहे माहित नाही … नव्हे मला ते तसेच राह्यला हवंय. गुरु आणि राहुल दोघांना या कार्यक्रमासाठी आणि भविष्यकालीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
” शब्द सूर जणू डोह कालिंदीचे
त्यात भासे बोल सुरेल मुरलीचे
आकंठ रंगले मी
अन शब्द ही …
फुटले धुमारे भावगंधांचे
मैफिलीत या शब्दसुरांचे …”
Shilpa Khare
शब्दसुरांच्या मैफिलीचा आमच्ब्दायासाठी शब्दातीत अनुभव👌👌💐
एक भन्नाट अनुभव…. अनुभूती जास्त योग्य शब्द. कार्यक्रमाचं गारूड अजून आहे आणि ते असच राहणार आहे.
रासिकप्रेक्षकांनी पूर्ण भरलेलं सभागृह , कानात प्राण ओतून ऐकताना येणारी सगळ्यांची दाद आणि समोर तुम्ही दोघं….काय काय आणि किती साठवू असं झालं होत मला.
गुरु तू शब्दकुबेर आहेस … Wish you all the best.
ही मैफिल सदा अशीच बहरत राहो…
आणि ही मोहीनी सदोदित रसिकांच्या मनावर राहो.
पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.