Maifil Shabd Suranchi – 31 May 2019 – Shivaji Mandir Mumbai
३१ मे २०१९, शिवाजी मंदीर – दादर, मुंबई. मैफिल शब्द सुरांची
प्रेक्षकांशी परस्पर संवाद साधणाऱ्या ‘मैफिल शब्दसुरांची’ ह्या कार्यक्रमाचा भारतातील दुसरा प्रयोग ३१ मे २०१९ रोजी शिवाजी मंदीर – दादर येथे सादर झाला. कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ह्या कार्यक्रमात, कविता कशी लिहिली जाते? कविते प्रमाणे चाल सुचते कि चालीवरून गीत तयार होते? वगैरे प्रेक्षकांच्या शंकांना उत्तरे देतांना गुरू ठाकूर आणि राहुल रानडे स्वतःचे अनुभव सांगतात आणि त्याचे प्रात्यक्षिक देतात.
कार्यक्रम पाहून झाल्यानंतर एक भारावलेल्या उत्साही श्रोत्या, प्रीती विष्णु बने, यांनी पाठवलेलं विवेचन…..
किती नितांत सुंदर प्रक्रिया!
रसिक प्रेक्षक-श्रोत्यांनीच गाण्याचा प्रकार सांगायचा; विरहगीत हवे, प्रेमगीत हवे, देशभक्तीपर गीत हवे, अभंग हवा की लावणी…आणि त्यांनीच त्या गीताला साजेसे शब्द द्यायचे. गीतकाराने ते शब्द आपल्या ओंजळीत गोळा करून म्हणजे वही/डायरीच्या पानावर लिहून काढून, त्या शब्दफुलांना भावानुरूप छानश्या गीतात गुंफायचे! त्या गीताला मग संगीतकाराने तिथल्या तिथे चाल लावायची, संगीत द्यायचे आणि ते संगीतसाज ल्यालेले गीत श्रोत्यांकडूनच गाऊन घ्यायचे!
काल प्रेक्षक म्हणून मी या प्रक्रियेत सहभागी झाले होते. राहुल रानडे सर स्टेजवरून खाली उतरून श्रोत्यांशी संवाद साधू लागले. ‘कोणत्या प्रकारचे गीत हवे?’, असे त्यांनी विचारता, कुणी विरहगीत म्हणाले, कुणी प्रार्थना म्हणाले तर कुणी प्रेमगीत! सर्वानुमते प्रेमगीतावर शिक्कामोर्तब झाले. ‘प्रेमगीत कसे?’ तर पावसात चिंब भिजलेले.
‘आता शब्दही तुम्हीच द्यायचे! गीतात गुंफायला पुरेसे शब्द लाभले की गुरू बस् झाले म्हणेल. तोवर शब्द सांगा.’ रानडे सर.
श्रोत्यांकडून उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. ‘रिमझिम, धुके, छत्री, श्रावण, तरंग, चिंब, मोर, सर, काहूर, किनारा, शिरशिरी, नभ, कुंद,धुंद, शहारा, मृद्गंध, ऊन्हाळ्यानंतर बरसणारा पाऊस’ एका पाठोपाठ एक शब्दांच्या सरी बरसू लागल्या. स्टेजवर वही/डायरीत ते टिपून घेणाऱ्या ‘गुरू ठाकूर’ यांनी ‘पुरे’ म्हणताच, शब्दांचा ओघ थांबवला गेला.
त्यानंतर एका वेळी दोन गोष्टी घडत होत्या. एकीकडे सभागृहात, राहुल रानडे सर श्रोत्यांशी संवाद साधत होते; तर दुसरीकडे स्टेजवर असलेले ‘गुरू ठाकूर’ शब्दांना गीतात गुंफण्यात तन्मय झाले होते.
माझे कान रानडे सरांच्या बोलांकडे लागले होते तर नजर ‘गुरू ठाकूर’ यांच्या बोटांवर स्थिरावली होती. लेखणी धरलेला हात स्थिर होता, आणि बोटे पानावर थिरकत होती. दरम्यान दोन-तीनदा पान पलटले गेले. दिलेले शब्द गीतात चपखल बसणे गरजेचे होते. शब्दबांधणीची क्रिया चालू होती तर!
इकडे रानडे सर आठवणींना उजाळा देत होते, “…..मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे, अभिमान वाटतो आहे की गुरू ठाकूरचे ‘तू बुद्धी दे, तू तेज दे…’ हे गाणं, ही प्रार्थना, या वर्षीपासून दहावीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. तेव्हा गुरू ठाकूर साठी जोरदार टाळ्या!”
टाळ्यांचा गजर चालू असतानाच गुरू ठाकूर यांनी वहीत गढलेली नजर वर उचलली. गीत लिहून झाले होते तर!
मिळालेल्या शब्दांतून त्यांनी गीत लिहिलं होतं:-
रखरखणाऱ्या ऐन दुपारी
रिमझिमणारा श्रावण तू ।
पाण्यावरला तरंग हळवा
शहारणारा तो क्षण तू ।
चिंब क्षणी या उठते काहूर
गोड शिरशिरी तनूवरी ।
मोर होऊनी मोहरते मन
मृद्गंधाची जादुगिरी ।
साद घालते भान हरपून
असे बावरे यौवन तू ।
पाण्यावरला तरंग हळवा
शहारणारा तो क्षण तू ।
– गुरू ठाकूर
गीत तर लिहून झाले होते. आता त्याला संगीताचे लेणे चढवायचे होते. ते काम होते, संगीतकाराचे अर्थात राहुल रानडे सरांचे.
रानडे सर स्टेजवर गेले. गुरू ठाकूर श्रोत्यांशी संवाद साधण्यासाठी खाली आले. इकडे सुसंवाद चालू होता तर तिकडे गाणं संगीतबद्ध केले जात होते.
काही मिनिटांतच गाणे संगीताने सजले.
या गीताला राहुल रानडे सरांनी सहज सोपी, छानशी चाल लावली आणि सगळ्यांकडून ते एका चालीत म्हणून घेतले.
– प्रीती बने
मन:पूर्वक धन्यवाद सर! माझे लेखन आपल्या ब्लॉगवर समाविष्ट करून घेतल्याबद्दल.
हा अवर्णनीय अनुभव घेता आला हे माझे भाग्य. आणि प्रत्येक दर्दी रसिकांना तो घेता यावा ही सदिच्छा.
ही मैफिल सदा बहरत राहो.
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.