“उसवले धागे कसे कधी, सैल झाली गाठ
पावलांना ही कळेना, का हरवली वाट
का किनारे फितूर झाले, वादळाला ऐनवेळी,
कोणत्याही चाहुलीवीण, का अशी स्वप्ने बुडाली
मागण्या आधार उरला, एक ही ना काठ
सावली म्हटली तरीही, भावना असती तिला
सोबतीची आस वेडी, का अजून लागे मला
गुंतणे माझे सरेना, तू फिरवली पाठ
वाटते आता हवे, ते तुझे गंधाळणे
पोळलेल्या या जीवा, दे जरासे चांदणे
सोसवेना चालणे हे, एकटे उन्हात..
“दिवस ओल्या पाकळ्यांचे
जाणिवांना गंध ओले
स्पंदने बेभान आणि
हात हाती गुंफलेले,
दिवस वेडे स्वप्नपंखी
रेशमाची झूल झाले,
ओंजळीने मागण्या
आधीच झरले मेघ सारे….
दिवस मोहरल्या मनाचे
सुख नवे घेऊन आले
,चांद थोडा लाजला अन्
चांदणे टिपूर झाले…”
“गुणगुणावे गीत वाटे,शब्द मिळू दे थांब ना,
हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना,
गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना,
तोल माझा सावरू दे थांब ना….
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा,
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा…
सापडाया लागले मी,ज्या क्षणी माझी मला,
नेमका वळणावरी त्या, जीव हा भांबावला,
खेळ हा तर कालचा,पण आज का वाटे नवा,
कालचा हा खेळ बघ वाटे नवा….
बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे,
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे,
वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा,
उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा…”