Manuski

माणुसकी

‘हे सगळं कशासाठी ?’ समोरच्या पेपरवरच्या ‘ वाघ वाचवा मोहिमे ‘ च्या पानभर जाहिरातीकडे बोट दाखवत ते म्हणाले. गोव्याच्या विमानतळावर आम्ही दोघेही आपापल्या फ्लाइट्ची वाट पहात होतो. नुकत्याच झालेल्या ओळखीतून इतकंच समजलं होतं , नव्वदीतले ते आजोबा नागपूरच्या वृद्धाश्रमात असलेल्या आपल्या मित्राला भेटायला चालले होते.

‘ गरज आहे हो , वाघ दुर्मिळ होत चालले आहेत ना ?.. फार गंभीर बाब आहे ही… ‘ गप्पांना विषय छान आहे म्हणून मी संवाद चालू ठेवला. ‘ मला वाटतं त्याहून झपाट्याने दुर्मिळ होत चाललेल्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं आहे…पण लक्षात घेतंय कोण ?’
‘ यू मीन चित्ता ? व्हाइट पिकॉक… ‘
‘ माणूस… ‘ ते म्हणाले.
‘ गुड जोक… मला वाटतं तो एकच प्राणी जगात झपाट्याने वाढतोय. बाकी सारे दुर्मिळ होतील काही वर्षांनी… ‘
‘ नो.. आय एम नॉट जोकिंग… मी
‘ माणूस म्हणालो.. माणूस ‘… संख्या वाढतेय ती मानव प्राण्याची… पण ‘ माणूस ‘ मात्र दुर्मिळ होत चाललाय… पुरावा हवाय ?’ हातातला पेपर माझ्यासमोर धरत म्हणाले.. ‘ बघा… पाच वर्षांच्या मुलीवरच्या बलात्काराची बातमी होती… बलात्कार , खून , भ्रष्टाचार , बॉम्बस्फोट…. माणूस नाही फक्त प्राणी आहे तो , मानवी रूपातला… ‘.
मग दुसऱ्या बातमीकडे बोट दाखवत म्हणाले , ‘ पहा मनुष्यरूपी यंत्र… रस्त्यावर अपघात होतो , बलात्कार होतो , तेव्हा मदतीची भीक मागणारे हात पाहूनही सरळ दुर्लक्ष करून ही यंत्र निघून जातात… जो तो फक्त स्वत:पुरता… स्वत:साठीच. आणि स्वत:भोवतीच फिरणारा… यंत्रमानव.. संवेदनाहीन.. नेमकं काय हरवलंय माहित्ये का ? … माणूसकी ‘.
मानवप्राणी + माणूसकी = माणूस… पण ती माणुसकीच मिसिंग आहे.

‘ वाघ नाहीसे झाले कारण ते जंगलात राहतात… जंगलं संपवली आपणच. मग वाघ संपणारच. पण माणुसकी ? ती जंगलात नाही मानवी वस्त्यात होती. त्या वस्त्या वाढल्या शेकडोपटीने तरीही माणुसकी दुर्मिळ झाली. खरी गंभीर बाब ही आहे. माणुसकी म्हणजे सलोखा , खरेपणा , दुसऱ्याकरता निस्वार्थपणे काहीतरी करायची वृत्ती. विश्वची माझे घर म्हणणाऱ्या माऊलींचा परीघ मोठा होता. तो मग हळूहळू माझा देश , नंतर अनुक्रमे माझं राज्य , माझा गाव असा संकुचित होत गेला. पूर्वी किमान एका गावातला माणूस तरी दुसऱ्याला परका वाटत नव्हता आता एका कुटुंबातलेही परके वाटू लागलेत. स्वत:च्या आईवडिलांसाठी काही करणेही परके वाटणाऱ्या पिढ्या जन्माला आल्यात. अशाप्रकारे माणुसकीचा झपाट्याने आटणारा झरा हा खरा चिंतेचा विषय आहे. हे अधिक वाढलं तर स्वत:च्या स्वार्थापोटी भावनाशून्य झालेली माणसं एकमेकासमोर उभी ठाकतील. तेव्हा विनाश अटळ आहे. त्याआधी माणुसकीचं पुनरुज्जीवन गरजेचं आहे. नव्या पिढ्यांत संस्काराची लस टोचून ते शक्य आहे. कारण ते झालं तर माणूस टिकेल. माणूसपण टिकेल. अणि तो टिकलेला संवेदनशील आणि संस्कारक्षम माणूस जगाचा विनाश होणार नाही याची निश्चितच काळजी घेईल..! ‘
ते बोलायचे थांबले. वयामुळे की हळवं झाल्यामुळे माहीत नाही पण त्यांचा श्वास भरून आल्यासारखा वाटला.
‘ माफ करा फार बोललो… पण हा विचार पोचावा असं वाटलं… आमचा आवाज आमच्यापुरताच! तुम्ही कवी आहात. कवितेतून हा विचार मांडलात तर चार लोकांपर्यंत जाईल.. म्हणून सांगितलं ‘. इतक्यात त्यांच्या फ्लाइटची उद्घोषणा झाली. निरोप घेऊन ते गेले… मी त्यांचे विचार कवितेत मांडू लागलो.
माणसानं माणसांच्या वस्त्या रूजवताना
आटवून टाकल्या नद्या , पेटवून दिली रानं
अन मग फोफावणाऱ्या सिमेंटच्या जंगलात
बसून झोडू लागला परिसंवाद
गेल्या काही वर्षांत झपाट्याने घटत गेलेल्या
वाघांच्या संख्येवर…
पण त्याहून झपाट्यानं घटलेल्या एका गोष्टीचं
त्याला सोयरसुतकही नाहीय
माणुसकी ‘ म्हणत असत तिला
माझ्या माहितीप्रमाणे…
तिचं पुनरुज्जीवन जास्त गरजेचं आहे
कारण ती तगली तर वाघच काय
जगातला कुठलाच प्राणी दुर्मिळ होणार नाही..
अगदी ‘ माणूस ‘ देखील

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*