Naro Mhane Aata
नारो म्हणे आता निरोपाचे बोलू…!!!!
“२०१३ संपलं???? नारो म्हणे आता निरोपाचे बोलू” असं म्हणत ते परतीच्या उंब-याशी उभं आहे.. अन माझा हात निरोपाकरता उचलत नाहिये…. कारण या वर्षानं खरंच भरभरुन दिलं…
या वर्षभरात माझे बालकपालक(BP), नारबाची वाडी, झपाटलेला २, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, धामधूम, थोडं तुझं थोडं माझं, मंगलाष्टक वन्स मोअर, अंगारकी असे काही सिनेमे पडद्यावर आले. त्यातही “नारबाची वाडी” या मी पटकथा, संवाद आणि गीतलेखन केलेल्या सिनेमाला रसिकांनी आणि समीक्षकांनी दिलेली दाद खरंच अविस्मरणीय आहे. साधा सोपा विषय आणि सोप्पी पण काहीतरी बोध देणारी गोष्ट तुमच्याकडे सांगण्याची हातोटी असेल तर रसिकांना आजही ऐकायला आवडते हे या सिनेमानं मला सांगितलं. तसंच अनेक वर्षे चित्रपटांकरता गीतलेखन करताना गाण्यात सुरेख काव्य असावं, हळुवार अस्सल मराठमोळे शब्द यावेत अन मग त्या काव्याचं गीत व्हावं ही इच्छा “मंगलाष्ट्क वन्स मोअर” ने पुर्ण केली आणि आजची तरुणाई भावगीताच्या अंगाने जाणारी हळूवार शब्दप्रधान गाणी स्वीकारणार नाहीत हा इथल्या मंडळीचा समज खोटा ठरला. उत्तम भाषेवर आणि शब्दांच्या श्रीमंतीवर प्रेम करणारा प्रेक्षक शिल्लक आहे याची ग्वाही या दोन सिनेमांनी मला दिली. माझा आत्मविश्वास दुणावला…
’गीतकार’ म्हणून पुरस्कार सदैव मिळतातच पण ’कवी’ म्हणून या वर्षी साहित्य क्षेत्रातून मिळालेली दाद मोलाची होती.
या वर्षी साहित्य परिषदेकडून गेय कवितेकरता मिळालेला ’ना.घ देशपांडे पुरस्कार’ म्हणूनच मोलाचा वाटतो.
या शिवाय कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, नाट्ककार अशा चौफेर यशाबद्दल मिळालेला ’गदिमा प्रतिष्ठान’ चा ’चैत्रबन’ पुरस्कार पाठीवर कौतुकाची थाप देऊन गेला.
’Indian Music Acadmy’ ने ’Outstanding Lyricist of Marathi Music industry in Last 5 Years’ म्हणून माझी केलेली निवड हा सुखद धक्का होता…
या वर्षात काही वेगळ्या धटणीच्या सिनेमांकरता वेगळं काम करायची संधी मिळाली त्यातले अजय अतुलसोबत ‘लयभारी’, अवधूत गुप्तेसोबत ‘एकतारा’, आनंद मोडकांसोबत ‘मालक’, आदेश श्रीवास्तवसोबत ’माया’, कौशल ईनामदारसोबत ’यल्लो’, रवी जाधवचा ’टाईमपास’, गिरीश मोहितेचा ’बाईस्कोप’, ‘Parikrama’ या international band सोबत “अकल्पित”, निलेश मोहरीरसोबत ‘ढोलताशे’, अपेक्षा दांडेकरसोबत ’अधांतरी’, राहुल जाधवचा ’Hello Nandan’ हे सिनेमे लवकरच म्हणजे २०१४ मधे रसिकांच्या भेटीला येतील.
सिनेमा व्यतिरिक्त काही वेगळे प्रयोगही केले ज्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली ते म्हणजे ..आमच्या ’गुरुयोग म्युझिक कंपनी’तर्फे काव्य रसिकांसठी आणलेली “असे जगावे“ही माझ्या निवडक कवितांच्या काव्य वाचनाची audio सीडी आणि “किणकिण कांकणा तुझी” या मी लिहिलेल्या आणि योगिता चितळे हिने संगीतबद्ध करुन स्वप्निल बांदोडकरसोबत गायलेल्या मालवणी video गीताचं 9x jhakas वर झालेलं आगमन.
एकूणच हे वर्ष कलावंत म्हणून सतत चैतन्य उत्साह सळाळता ठेवणारं ठरलं..म्हणूनच असेल कदाचित त्याला निरोप देताना स्वर जडावतोय..कातर होतोय…!!!
2013 साल घवघवीत यशाचा पाऊस पाडून गेलं तुझ्यासाठी! मग निरोप द्यायची वेळ येताना मन कातर होणं साहजिकच.
यशाच्या पाककृतीत सातत्य, प्रयत्नांची पराकाष्टा, नाविन्याचा शोध यांची यथायोग्य सांगड लागते शिवाय beyond comfort zone कष्ट करायची तयारी लागते ,you always have it in you….
Always proud of you , god bless