www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook

Apsara Aali Indrapuritun

Aata Vajale ki Bara

Kagal Gavcha Guna (Katav 1)

Achuk Padali Thingi (Katav 2)

Khel Mandala

Natarang Ubha

Apsara Aali Indrapuritun

कोमल काया कि मोहमाया पुनवचांदनं न्हाली
सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्‍नप्रभा तनू ल्याली
ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली रत्‍नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदनी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली

छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार गुलजार
सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार
शेलटी खुणावे कटि तशी हनुवटी, नयन तलवार

ही रति मदभरली दाजी ठिनगी शिनगाराची
कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वार्‍याची

ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहुन थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली रत्‍नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदनी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली

Aata Wajale ki Bara

चैत पुनवेची रात आज आलिया भरात
धडधड काळजात माझ्या माईना
कदी कवा कुठं कसा जीवं झाला येडापीसा
त्याचा न्हाई भरवसा तोल र्‍हाईना
राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले
पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी काळयेळ न्हाई बरी
पुन्हा भेटु कवातरी साजणा
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय करता, दाजी हिला भेटा की येत्या बाजारी
सहाची बि गाडी गेली नवाची बि गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

ऐन्यावानी रुप माझं उभी ज्वानीच्या मी उंबर्‍यात
नादावलं खुळंपीसं कबुतर हे माज्या उरात
भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची
उगा घाई कशापायी हाये नजर उभ्या गावाची

शेत आलं राखनीला राघु झालं गोळा
शीळ घाली आडुन कोनी करुन तिरपा डोळा
आता कसं किती झाकू सांगा कुटवर राखू
राया भान माझं मला र्‍हाईना
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय करता, दाजी हिला भेटा की येत्या बाजारी
सहाची बि गाडी गेली नवाची बि गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

आला पाड झाला भार भरली उभारी घाटाघाटात
तंग चोळी अंग जाळी टच्च डाळींब फुटं व्हटात
गार वारा झोंबणारा द्वाड पदर जागी ठरंना
आडोश्याच्या खोडीचं मी कसं गुपीत राखू कळंना

मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा
औंदाच्या गा वर्साला मी गाठलं वय सोळा
जीवा लागलीया गोडी तरी कळ काढा थोडी
घडी आताचि ही तुम्ही र्‍हाऊ द्या
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय करता, दाजी हिला भेटा की येत्या बाजारी
सहाची बि गाडी गेली नवाची बि गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

Kagal Gavcha Guna: Katav (1)

कागलगावचा गुना, ऐका त्याची कहानी
रांगडा ज्याचा बाज, आगळं हुतं पानी

पैलवानी तोरा त्याचा रुबाब राजावानी
कवतिक सांगु किती, पठ्ठ्या बहुगुनी

ऐसा कलंदर त्याचा येगळाच ढंग
हाती हुन्‍नर, डोस्क्यामंदी झिंग

Achuk Padali Thingi: Katav (2)

अचुक पडली ठिणगी पेटलं सारं रान
काळयेळ इसरलं गडी ऱ्हायलं न्हाई भान

चढू लागला रंग, दंग सारी दिनरात
पर मधिच शिंकली माशी झाला कि हो घात

मिरगाचा हंगाम दाटला फाटलं आभाळ
इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ

Khel Mandala

तुझ्या पायरीशी कुनी सानथोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला …. खेळ मांडला

सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार पाठीशी तू ऱ्हा हुबा
ह्यो तुझ्याच उंबर्यात खेळ मांडला

उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
भ्येगाळल्या भुईपरी जीनं अंगार जिवाला जाळी
बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे
इनविती पंचप्रान जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा जळलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला … खेळ मांडला

Natarang Ubha Lalakari

धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट
नटनागर नट हिमनट पर्वत उभा
उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग
पख्वाज देत आवाज झनन झंकार
लेउनी स्त्रीरूप भुलवी नटरंग

रसिक होऊ दे दंग चढु दे रंग असा खेळाला
साता जन्मांची देवा पुन्याई लागु दे आज पनाला
हात जोडतो आज आम्हांला दान तुझा दे संग
नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग

कड्कड् कड्कड् बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची
छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो ईच ईनंती यावं जी
किर्पेचं दान द्यावं जी … हे यावं जी किर्पेचं दान द्यावं जी

ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर उपकार
तुज चरणी लागली वर्णी कशी ही करणी करु साकार
मांडला नवा सौंसार आता घरदार तुझा दरबार
पेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग
नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग

कड्कड् कड्कड् बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची
छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो ईच ईनंती यावं जी
किर्पेचं दान द्यावं जी … हे यावं जी किर्पेचं दान द्यावं जी

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top