Radio Manacha Halva Kappa
रेडीओ.. मनाचा हळवा कप्पा…
अस म्हणतात ट्रेंडनुसार गाणी बदलतात संगीत बदलतं..पण अशी मोजकीच गाणी आहेत जी अनंत काळ टिकून आहेत.अर्थात जे उत्तम असतं ते ट्रेंड्च्या अनेक लाटा पचवूनही टिकतच.ब-याच जुन्या गाण्यांच्या बाबतीत हे पहायला मिळतं पण म्हणून.नवीन ते वाईट असा अर्थ होत नाही प्रत्येक दशकात बरी वाईट गाणी येत रहातात.त्यातली उत्तम ती रसिकांच्या मनात खोल रुतुन बसतात आणि दिर्घायू होतात बाकीची प्रवाहासोबत वाहून जातात. पण पुन्हा मी असंही म्हणेन की विस्मृतीत गेलेली सारी गाणी वाईट असतात असं नाही काही उत्तम गाणी केवळ रसिकांपर्यंत पोहोचलीच नाहीत म्हणून विसरली जातात याला कारण माध्यमं आहेत.
माझ्या लहान पणी घराघरात रेडीओला मानाचं स्थान होतं.त्यावरुन सतत मराठी गाणी वाजत इतकी की ती कानातून जाऊन मनात खोलवर झिरपून आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जात.लहान पणी जे मनात घर करतं ते अनंत काळ आपल्या मनात रहातं कारण ते केवळ गाणं नसतं तर आपल्या बालपणाचा एक भाग असतं.म्हणून आजही माझं गाणं खूप आवडलं असं एखाद्या लहान मुलाच्या वा त्याच्या पालकांच्या तोंडुन ऐकतो तेव्हा निश्चिंत होतो की आपल्या गाण्याला पुढ्ची ५०-६० वर्षे मरण नाही .खरं सांगायचं तर रेडीओ कोप-यात गेला आणि मनाचा तो रसिक कोपरा सुना झाला. रेडीओची जागा टिव्हीने घेतली पण टिव्ही वरची गाणी श्रवणीय होण्यापेक्षा प्रेक्षणीय होत गेली डोळे सुखावले पण कान आणि मन मात्र त्या जुन्या आठवणीत गुरफटुन राहिले…
भावसंगीत तर पोहोचेचना अस्सल रसिकांपर्यंत. उत्तम काम करणारी संगीतकार गीतकार गायकांची नवी पिढी पोहोचायची कशी ?
त्यात सिनेमांच्या मल्टी रिलीज मुळे २५- ५० आठ्वड्यांचा धदा ८-१० आठवड्यात करुन सिनेमे बस्तान हलवतायत त्यातली गाणी मनात रुजतायत म्हणेस्तोवर त्याच कुंडीत नवी रोपं लागतायत ..नवी गाणी नवं संगीत आठवड्याला ४ सिनेमे जवळपास २० गाणी पण ती रुजायला फोफावायला वेळ नको? त्यातही काही पिंपळासारखी जिद्दीने तग धरतात पण बाकीच्यांचं काय..म्हणून गरज आहे रेडीओ ची…FM वरुन मराठी गाणी वाजावी ही रसिकांसाठी आसुसलेल्या कलावंताची आस आहे तशीच उत्तम संगीतासाठी व्याकुळलेल्या रसिकांचीही हाक आहे.
त्यातल्या त्यात रिआलिटी शोज नामक प्रकाराने थोडा दिलासा दिलाय.त्यातुन गायक घडतात का? त्यांना व्यासपीठ तरी मिळतं की! असे अनेक वाद प्रतिवाद असले तरी त्यातुन लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रसिकांना मराठी गाणी संगीत ऐकू येउ लागलं नव्या पिढीत आपल्या मराठी गाण्यातही गंमत आहे याची जाण आली.ब-याच नव्या संगीतकार, गीतकार,गायक यांच्या मेहनतीला दाद मिळाली.ते त्यांच्या रसिक मायबापा पर्यंत पोचले पोहोचले हे ही नसे थोड्के.पण हे बीज जर फोफावायला हवे असेल तर रेडिओला पर्याय नाही.FM वाहिन्यांवर नुकताच झालला झालेला चंचूप्रवेश पुढे जाउन तिथल्या सो कॉल्ड पॉलीस्यांच्या अभेद्य भितींना खिंडार पाडेल ही आशा ही हळवं करणारी आहे.
काही उत्तम गाणी रसिकांपर्यत पोहोचली नाही म्हणून ती विसरली जातात ….? Why media feckless about those songs …?
ह्याचं उत्तर त्या-त्या वेळच्या माध्यम प्रसारकांनीच द्यावं.