Rutuheen
ऋतुहीन
शहराला हळवं करत नाही चैत्र पालवी,
शहराला होत नाही कधीच हिरवी रंगबाधा,
शहराच्या पाठीवर उमटत नाही ऋतूंची लिपी…
अन् चैत्र चाहुलींने कंठ फुटल्या पाखराचं गाणं, पोहोचतच नाही
शहराच्या डेसीबल झोकून बधीरलेल्या कानात!!
फुटलेच इथल्या निबर भिंतींना लालुस पोपटी डोळे,
तर ते फोडले जातात व्यावहारिक शहाणपणाने.
सिमेंटच्या कातड्याखाली दबलेल्या मातीचा दरवळ
मातीखालीच विरुन जातो …!
म्हणून हल्ली प्रत्येक ऋतू, शहर दिसताच दूरुन जातो.
शहर मात्र वहात रहातं डोळे मिटून.
कधी घामेजल्या चिंतांच्या पखाली सांभाळत
तर कधी बेगडी जल्लोषात बेभान होत, यंत्रवत शुभेच्छा देत रहातं ..
चैत्राच्या,वसंताच्या, श्रावणाच्या…!!!
© गुरू ठाकूर
सिमेंटच्या कातड्याखाली दबलेल्या मातीचा दरवळ मातीखालीच विरून जातो …क्या बात है !
पण ऋतू भिडतात त्या शहरातल्या माणसांच्या मनाला अन् मग तिथे मात्र होते आयुष्याला रंगांची बाधा,
लाल, हिरवा, गुलाबी, पिवळा, भगवा.. मग भासू लागतो प्रत्येक सण हवाहवा..
अगदी मान्य आहे.. पण सर,शहर वसवली माणसाने, त्यात चकचकीत शहरीपणा आणला तोही माणसानेच.. ह्यात शहराची काय चूक. चूक आहे ती माणसाची, माणुसकी मारून शहराला बकालपणा अणि घाणेरडे बनवले. अश्या वेळी इथे कसे काय ऋतू कळणार? माणसाने सुधारण्याच धारिष्ट्य दाखवला तर शहर ही हिरवीगार होतीलच की… ती होवोत, हीच अपेक्षा अणि सदिच्छा.