Sarkar Mhanu Nako
“सरकार” म्हणू नको..
“भडवं सरकार ढेकनाच्या बी माथ्यावर लुचतंय राव..पैलं खिसा रापयचं आता पोराबाळांच्या तोंडचा घास वरबाडुन झाला..तरी थांबंना ..रगात बी ठेवीना आंगात..कसं जगावं हो???”
“मणमोहण म्हंतय सुदार्ना पाय्जे तर हे हुनारच..असली उपासानं जीव गेल्यावर सुदारना काय फुली फुलीत घालायची का?”
“सरकारात बी मान्सच अस्त्यात ना रं ? तेना काय मानुसकी असंल का नाइ?…”
“तेनला कुठ दिडक्या मोजाव्या लागतात गड्या..आपल्या बुडाखालचा चटका तेना कुठं कळायला..”
“आस्सं?”
“मंग..गिदाड कवा शिकार कर्ताना पहिलंयस व्हय? ते जगतंय मड्याच्या टाळुवरलं खाउन..त्यातलं हाय ह्ये..तितले वळू कोटींचा चारा खाउन माजताय्त नी आपली गुरं वासरं आचकं देत्यात..ती मेली की दुष्काळ निधीचं सरकारी लोनी झाइर हुइल की पुन्ना गिदाडांचं फावल”
“मायला “सरकार” म्हनलं तरी डोकं सराकतं बग..पैली माजी रुकमी लाडानं म्हनायची मला..पन परवाच्याला सांगुनच टाकलं तिला..वाटलं तर बापावरुन शिवी दे पन “सरकार” नगं म्हनू..!!
हा संवाद प्रातिनिधिक..पण दर चार दिवसानी भडकत चाललेला महागाईचा आग डोंब.अघोरी होत चाललेली कायदा सुव्यवस्था या सा-याने ‘सरकार’ नावाचा एक क्रूर जहाल राक्षस आपल्याला पिळुन काढतोय अन आपण त्याच्या विरोधात का्हीच करु शकत नाही ही खंत त्यातुन वाढलेली घुसमट इतकी भयाण आहे की तिला शब्दरुप द्यायचं म्हटलं तर असंच सूचतं..
उगाच मऊ दिसलं म्हणून कोपरानं खणू नको
शिवी दे वाट्टेल ती पण “सरकार” म्हणू नको
चटावलेली जीभ नाही वखवखलेली नजर
अजून रक्तात होतोय माझ्या माणूसकीचा गजर
चुकलो तर धिंड काढ पण “त्यांच्यात” गणू नको
शिवी दे वाट्टेल ती पण “सरकार” म्हणू नको
जमत नसतो शिकून देखील असला निबरपणा
दारीद्र्यात पिचलो तरी जपलाय अजून कणा
दाबून ठेवलंय पोटी ते ऒठी आणू नको
शिवी दे वाट्टेल ती पण “सरकार” म्हणू नको
– गुरु ठाकूर
आज सरकार बदललं आहे पण परिस्थिती सारखीच आहे , दारूच्या एका बाटलीवर voting करणारी जनता आहे आपली मग त्यात सरकारचा काय दोष …?
एका अर्थी खरंय ते. पण जनतेची मानसिकता ह्या पातळीवर येऊ द्यायला जबाबदार कोण? सरकारच ना?