Shraddhanjali by Guru Thakur
२०१८ साली लिहिलेला एक लेख नुकताच सापडला. खास वाचकांसाठी. -गुरू
श्रद्धांजली – गुरू ठाकूर
देवमाणूस हरपलायशवंत देव यांच्या जाण्यामुळे, शब्दांचे मनोगत ओळखून त्यांना सुरावटी बहाल करणारा देवमाणूस हरपला आहे…
देवमाणूस हरपला
यशवंत देव यांच्या जाण्यामुळे, शब्दांचे मनोगत ओळखून त्यांना सुरावटी बहाल करणारा देवमाणूस हरपला आहे. असे खूप कमी लोक आहेत ज्यांना शब्दांच्या मूडप्रमाणे संगीत देता येते. देवकाका हे त्यापैकी एक होते. आजकाल अशी माणसे खूप दुर्मिळ होत चालली आहेत. मुळात अनेकांना कविताच कळत नाही. पण, खळेकाका, देवकाका ही अशा दुर्मिळ मंडळींपैकी होती. जे त्या शब्दांमागचा भाव बरोबर पकडून त्यानुसार ते गाणे शोधीत जायचे. त्यात देव स्वत: कवी होते. ज्यांच्या गाण्यांवर आमच बालपण पोसलं गेलं. अशा प्रकारे काम करणारी ती पिढीच आता हळूहळू नाहीशी होत आहे. देवकाकांचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ खूप जबरदस्त होता. कधीही फोन केला की त्यांच्या बोलण्यातून एक खट्याळ सूर जाणवायचा. सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. त्यांनी मला फोन केला, की ‘मला तुम्हाला भेटायचे आहे. तुम्ही भेटायला याल का?’ मी त्यांना म्हटले, ‘अहो, तुम्ही मला फोन करून भेटायला बोलावताय हेच माझे भाग्य आहे’. त्यानुसार मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या पत्नी करूणा देव त्यावेळी आजारी होत्या. आमच्या खूप छान गप्पा झाल्या. तुम्ही खूप छान लिहिता, असे त्यांनी मला सांगितले. जवळपास दोन तास मी त्यांच्या घरी होतो. त्यांनी मला ओशोंची पुस्तके भेट म्हणून दिली होती. कवितेवर ते बरेच काही बोलले. ओशोंची पुस्तके वाचून त्यावर त्यांनी काही लिखाणही केले होते. ज्या उत्साहाने, भरभरून ते बोलत होते ते पाहून खरेच छान वाटले. ओशो वाचनाने मला जगण्याकडे बघायची एक वेगळी सकारात्मक नजर मिळाली, असे ते म्हणाले त्यांच्यामध्ये एक प्रकारची सकारात्मकता उर्जा जाणवत होती. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हे पाडगावकरांचे शब्द चालीत बांधताना ते स्वत:च्या जगण्यातही बांधले असावेत, असे वाटत राहिले. ते नेहमी म्हणायचे, की ‘मी कवितेला चाल लावत नाही. कुठलीही कविता ती स्वत: घेऊन येते. मला ती दिसते. ती नेमकी पकडण्याचे काम मी करतो.’ हे सांगण्याचा दुर्मिळ मोठेपणा त्यांच्याकडे होता. त्यांच्यातील या देवत्वाला सदैव प्रणाम!
– गुरू ठाकूर
खरंच, किती आगळी वेगळी आठवणीतील शब्दरुपी श्रध्दांजली !!! अशी देता यायला हवी… मल या थोर कलाकारांबखबत फार माहिती नाही.. पण तुझ्या लिखाणातून ती मिळते, याचा खूप आनंद आहे….
धन्यवाद!!!
किती सुंदर शब्दात आठवण रुपी श्रद्धांजली वाहिली आहेस गुरु!
खरंच देव काका, खळे काकांसारखी माणसे पुन्हा होणे नलगे.
संगीत देणं आणि संगीत घडण यामध्ये संगीत घडण याला देव,दैव,प्रतिभा आणि चित्तवृत्ती एकवटून केलेल्या साधनेच बळ लागतं. मला वाटतं ते देव काका आणि खळे काकांबद्दल सत्य होत.
थोर कलाकारांप्रती असलेला तुझा विनम्र भाव तुझ्यातील कलाकाराचा मोठेपणा…..देव माणूस दाखवून जातो यात वाद नाही.
Stay blessed Guru