Sobat

सोबत

डबडबलेल्या डोळ्यांनी ताटकळावं
मोकळं होण्यासाठी
पापणी लवण्याची वाट पहात..
अगदी तसंच,
खूप दाटून येतं कधी कधी
बरंच काही अन मग
लिहावंसं वाटतं…
साचलेलं सारंच वाहून येतं
किती लिहू, काय लिहू होऊन जातं
एखाद्या निरव दुपारी…

कागद पेन, सारा जामानिमा हजर असतो
तरी देखील घुटमळत रहातो लिहिता हात
सापडतच नाही नेमकी सुरुवात…!
कोरा करकरीत कागद आ वासून पहात रहातो
याचकाच्या व्याकूळतेने
एखाद्या एकाकी दुपारी …

कसली तरी अनाहूत अगतिकता
आतल्या आतच पाझरू लागते
आणि मग मोकळं होण्यापेक्षा
त्या साचलेल्याचीच सोबत
हवीहवीशी वाटत रहाते..
कागद कोरेच राहून जातात

एखाद्या निरव वांझ… दुपारी!

– गुरु ठाकूर

8 replies
  1. S
    S says:

    ‘त्या’ला लिहीताना अगदी असंच होतं माझं. खूप काळ वाट पाहिलेली असते. इतकं साठवून ठेवलेलं असतं बोलायचं पण भेट होता होत नाही. वेळ काही जमून येत नाही. सुरुवातीची अधीरता मग हळूहळू बाजूला पडते, राग यायला लागतो. त्याच्या जवळ त्या वेळी असलेल्या व्यक्तींबद्दल असूया वाटायला लागते. आणि मग अवचित, अगदी काही क्षणांची भेट. त्यात राग व्यक्त करु, की किती वाट पाहतेय ते डोळ्यांनीच सांगू..की पुढच्या वेळी निवांत भेटायचं वचन घेऊ….खरं तर गरजच काय काही बोलायची.. त्याला सगळं अगदी नीट ठाऊक आहे..पण आहे तो क्षण हसून ‘कसा आहेस’ विचारेपर्यंत संपलेला असतो..घड्याळाचाही प्रचंड तिरस्कार वाटायला लागतो अशा वेळी..आणि मग ठरवलेल्यातलं काहीच होत नाही..पुन्हा एकदा आपण एकटेच आणि सोबतीला ह्या सगळ्याने सॅच्युरेट झालेलं डोळ्यातलं पाणी..वाहू न गेलेलं (आरती प्रभूंचे शब्द वापरून).

    Reply
  2. शिरीन कुलकर्णी
    शिरीन कुलकर्णी says:

    खरं आहे. जातिवंत कलाकाराला ही घुसमट अनुभवावी च लागते. एका अर्थाने या प्रसववेदना असतात. मनातलं सारं कागदावर उतरल्यावर येणाऱ्या रितेपणापेक्षा कळा सोसणं हवंसं वाटतं. ज्यावेळी ही घुसमट असह्य होते, तेव्हा तिची अभिव्यक्ती झाल्याशिवाय राहत नाही. ज्याक्षणी ही निर्मिती होत असते, तेव्हा असं काही तेज निर्माण होतं की तो कलाकार देखणा दिसू लागतो. त्यातल्या कलेचं सौंदर्य त्यालाही वेढून घेतं. म्हणूनच लतादीदी सुंदर दिसतात, तबल्यावर बसलेले अपरंपार जळगावकर सुंदर दिसतात.

    Reply
  3. Dr namita nikade
    Dr namita nikade says:

    मोकळ होण्यापेक्षा साचलेल्याचीच सोबत हवीहवीशी वाटते…. मला ना बर्‍याचदा आईसमोर असली की अस काहीतरी होत.. म्हणजे मला रडायचं असत पण तिला पाहून हुंदका आतल्याआत गिळून होतो. डोळे डबडबून येणार असतात पण मोठा श्वास घेतला की सगळ शांत होतं.. हे feeling काही मला आज पर्यंत समजले नाही. शक्यतो मुली आई समोर मोकळ्या होतात पण मला जाम टेंशन येतं.

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*