Something Missing
समथिंग मिसिंग
‘धोंडू….मुम्बै इली रे..!’ असं म्हणून खळ्यातून जोरात हाळी देणारे आजोबा …अन् मग त्या हाकेमागोमाग लगबगीनं हातातली बॅग घ्यायला धावणारा धोंडू गडी…. देव्हाऱ्यात सोवळ्यानं चंदन उगाळता उगाळता सोवळं-ओवळं विसरून चंदनाचं खोड तसंच हातात घेऊन उंबऱ्याशी धावणारी आज्जी….आणि तिचं, “बरं झालं, पावसाआदी घराक पोचलात !’ हे वाक्य संपायच्या आत तडतड करत येणारी खोड्साळ पवसाची सर…
बालपणी गणेश चतुर्थीकरता कोकणात पोचलं, की या गोष्टी कधी चुकल्या नाहीत.
मग काकांसोबत मूर्ती पाहायच्या ओढीनं गणपतीशाळेत गेल्यावर तिथल्या पेट्रो मॅक्सच्या उजेडात डोळे बारीक करून गणेशमूर्तीच्या सिंहासनावरली नक्षी रंगवता रंगवता आपली एकाग्र नजर मुळीच न हलवता, “काय बॉ, मुम्बै कधी इली?’ आणि “यंदा तिसरीत ना रे? की चौथीत?’ हा प्रश्न अचूक विचारणारा तातू सुतार…
हरताळकेच्या उपासाकरता बागेतल्या माडावरली शहाळी उतरवण्याकरता बोलावलेला धाकू गाबीत…खरं तर हा मासेमारी करणारा; पण माडावर वानराच्या गतीनं चढताना आणि काही वेळा एका माडावरून लगतच्या दुसऱ्या माडावर झेपावताना मी त्याला इतक्या वेळा पाहिला होता, की नंतर स्पायडरमॅन वगैरे मं डळींचं कुतूहलच वाटेनासं झालं होतं! त्यात आमचा धोंडू गडी एकदा म्हणालादेखील होता, “धाकलो तिकडं अमेरिकेत जन्मलो अस्तो तर स्पयडरम् यानच्या माथ्यावर झालो आस्तो.’
त्या दिवसापुरतीच भेट असूनही धाकू माझ्या वर्षभर लक्षात राही ते आणखी एका कारणाने. प्रत्येक माडावरून उतरल्यावर कमरेच्या लटकत्या कोयत्यानं त्या शहा ळ्याचा शिरच्छेद करून माझ्यासमोर धरत तो म्हणे, “ह्या बग, मघाच्या पेक्षा जा स्त मधुर आसा…!’ सायीसारखं मुलायम खोबरं मिळावं म्हणून दहा माडांवरून चढ-उतार करणाऱ्या त्या काळ्याकभिन्न देहात कोवळ्या खोबऱ्याच्या सायीसारखं हळवं मन दडलंय हे कळण्याइतपत समज मला त्या वयात नव्हती; पण तरीही ती जाणीव मनाच्या कोपऱ्यात रुजली असावी. म्हणून आज चौपाटीवर रोख रक्क्म म ोजून घेतलेल्या शहाळ्यातल्या पाण्यातही मला काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं…
तिथून घराकडं परतलं की दारात अण्णा भटजींची हर्क्युलिसची दोन आरसेवाली सायकल दिसे. स्टॅंडवर लावलेल्या त्या सायकलीचं मागचं चाक पॅडल मारून फि रवताना कानावर अण्णा भटजींचा आवाज पडे ,”तांबडं फुटताना पैली पूजा तु मच्याकडं म्हणतोय; पण रात्री पावसान गुण उधळले नाई आणि व्हाळाला ( ओढ्याला) पाणी आलं नाई तर पुढची गजाल…!’
यावर आजोबांचं, “अरे अण्णा, पाणी आलं तर या धोंडूला धाडतो. तो उचलून आणेल तुला डोक्यावरून; पण सातच्या ठोक्याला पोच..!’ हे भरतवाक्य येत असे.
मग माटवीकरता रानफुलं अन् फळं तोडून आणणारा फटू धनगर.., गौराईकरता अबोलीच्या, सुरंगीच्या फुलांचे वळेसर (गजरे) घेऊन येणारी ताई सावतीण…, ऋषिपंचमीला त्या भाजीकरता रानातून कंदमुळं घेऊन येणारा जानू गुरव… अन् यातल्या प्रत्येकाची आपुलकीच्या भावनेनं विचारपूस करून त्यांना जेवू-खाऊ घालणारी माझी आजी…..
दर वेळी कोकणात गणपतीला निघालो, की ही सारी मंडळी माझ्या डोळ्यांसमोर उभी राहतात, अगदी गेल्या वर्षीचीच गोष्ट असल्याप्रमाणं! खरं तर काळाच्या प्र वाहात यातला एकेक जण वाहून गेला; पण मनाच्या कप्प्यातल्या त्यांच्या जागा भक्क्म करून गेला!
प्रगतीचा वेग वाढला आणि आठवणींत जमा होणाऱ्या वस्तूंची यादीही वाढत चालली. किमान आहे ते तरी पुढल्या पिढ्यांपर्यंत पोचवावं, या हेतूनं यंदा तळवशे उराशीर घेऊनच आलो अन् या हरवलेल्या गोष्टींची यादी प्रकर्षानं जाणवू लागली. काळाची महती सांगणारे काही दुवेच नाहीसे झाले होते. आधीच्या पिढ्या ंच्या भाबड्या भावूकपणाची जागा आता नवीन पिढ्यांच्या व्यवहारी तरबेजपणानं घेतली होती.
मी मुकाटपणे सारं टिपत होतो. वाटत होतं, आताच्या उत्सवात तेव्हाच्यातलं काहीतरी मिसिंग आहे. आता कोकणात काय अन् मुंबईत काय, गणपती सारखाच.
विसर्जनाच्या दिवशी मी पुन्हा एकदा भूतकाळात हरवलो. एरवी, तोंड भरून बोलणारी आज्जी त्या दिवशी गप्प गप्प असायची. एरवी प्रत्येक बाबतीत काटेकोर असणारे आजोबाही काहीतरी वेंधळेपणा करायचे. त्यांचा नेहमीचा सूरही हरवल् यासारखा वाटायचा. जेवणावळी, पंक्ती सारं साग्रसंगीत व्हायचं तसंच झालं; पण साऱ्यातूनच कसली तरी रुखरुख जाणवत होती. कुणीतरी आणलेला फटाका लाव ण्याकरता अगरबत्ती हवी म्हणून चोरपावलांनी देवघरात शिरलो. तिथल्या समईच्या प्रकाशात कोपऱ्यात उभी असलेली आजी दिसली. डबडबल्या डोळ्यांनी मूर्तीकडं एकटक पाहत काहीतरी बोलणारी… “आज्जी, तू रडत्येस?’ बालसुलभ कुतूहलानं विचारलेल्या प्रश्नावर, “नाही रे! धूर गेला उदबत्तीचा डोळ्यात’ असं म्हणून बाहेर जाणारी तिची पाठमोरी आकृती पुन्हा डोळ्यांसमोर तरळली.
आताच्या उत्सवात तेव्हाच्यातलं काहीतरी मिसिंग आहे. ते नेमकं काय, याचा शोध लागला होता. विसर्जनाकरता मूर्ती हलवली. अंगणात बाप्पाच्या हातावर ” पुढच्या वर्षी लवकर या…!’ म्हणत दही घालायला काकू सरसावली. नीट क्लोज मिळावा म्हणून मी हातावर चार्ज केला. कॅमेऱ्यात थरथर जाणवत होती. ट्रायपॉड असताना? मी नीट पाहिलं. थरथर काकूच्या हाताला होती. झूम आऊट होत तिच् या चेहऱ्यावर गेलो अन् आज्जी आठवली. तसेच डबडबलेले डोळे…तसेच थरथरते ओठ… हातातलं भांडं सुनेच्या हातात सोपवत चपळाईनं डोळे पुसत ती म्हणाली, “किती धूर करता रे उदबत्तीचा…!’
विसर्जनाकरता तळ्याच्या काठावर पोचलो अन् मोबाईल खणाणला. पलीकडून मु ंबईतला मित्र बोलत होता विसर्जनाच्या मिरवणुकीतून…मागं कानठळ्या बसवणारा डीजे सुरू होता. “अबे है किधर?’ आता तुझ्याच गाण्यावर नाचतायत सगळे आ णि तुला जाम मिस करतायत.. गणपती सगळीकडं सारखाच; पण इथं मुंबईत से लिब्रेशनची मजा सोडून कोकणात जाताना आम्हाला सांगतोस, की मुंबईत “सम थिंग मिसिंग’ वाटतं. असं नेमकं काय मिसिंग वाटतं रे तुला, ते तरी सांग!!’
त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊच शकलो नाही. कारण पाण्यात जाणारी मूर्ती पाहताना कॅमेऱ्याची थरथर वाढली अन् उदबत्तीचा तो धूर, जो वर्षानुवर्षं आज्जीच्या अन् काकूच्या डोळ्यांना झोंबला होता, तो माझ्याही डोळ्यात शिरला…!
तुमचा लेख वाचला,कोकणातलाच जन्म असला तरि सतत कोणत्या कोणत्या कारणांन मी हे सगळ miss केलं.कधी कधी आपली कितीहि इच्छा असली तरि तसच कधी घडत नाहि.त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टितला आनंद कधी मी अनुभवलाच नाहि आज तुमचा लेख वाचनात आला आणि तसच चित्र डोळ्यासमोर तरळलं,तुम्हाला हाक मारणारे तुमचे आजोबा मला माझे आजोबा असल्यासारखे भासले,खुप धन्यवाद तुमच्या या लेखामुळे काहि काळ का होइना माझ्याकडे नसलेल्या गोष्टि तरि असल्यासारख्या वाटल्या.तुम्हाला comment देण्याइतपत मोठि नक्किच नाहि पण तुमच्या लिखानाच्या प्रचंड प्रेमात आहे.अजून बरच राहिलय वाचायच…
खूपच छान.. सर खरंतर मी हे सारं कधी अनुभवलेलं नाहीये.. पण खूपदा वाटतं काहीतरी missing आहे.. पण काय हेच कळत नाही.. कदाचित हेच असावं..
सुंदर लहानपणी गणपतीला गावी जायचो ते सर्व क्षण जिवंत झाले वाचताना डोळ्यासमोर
हल्ली जात नाही का गावाला गणपती साठी?
khupch chan…he sagal kharach miss karto..kokan ani kokanatlya ganaptichi majach vegali