उरात धडधड सुरांत होते श्वास चुकवितो ताल परि
कशी सावरू तोल कळेना- पाऊल पडते अधांतरी !
कशी मोहिनी केली कोणी मलाच माझे ना कळते
मनात माझ्या फुलून अलगद फूल प्रीतिचे दरवळते
एक अनावर ओढ फुलविते गोड शिर्शिरी तनूवरी
कशी सावरू तोल कळेना- पाऊल पडते अधांतरी !
आठवणींच्या हिंदोळ्यावर होऊनि हळवे मी झुलते
कणाकणांतून इथल्या वेडा जीव गुंतला सोडवते
आनंदाचा घन पाझरतो गहिवर दाटून येई उरी
कशी सावरू तोल कळेना पाऊल पडते अधांतरी !
स्वप्न म्हणू की भास कळेना आज… मी बावरते
प्रीत जणू रेखीत तुझ्या मिठीत मी मोहरते
हात दे रे हातात राहू दे साथ, जन्मांतरी…. जन्मांतरी !
पाचूच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणंचुरा
पिवळीपिवळी बिट्ट्याची काचोळी नेसल्या डोंगर वाटा
माळून गजरे फेसांचे साजिरे सजल्या सागरलाटा
इथल्या रानात, तसाच मनात झरतो मायेचा झरा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणंचुरा
आंब्याला मोहर, बकुळी बहर, कहर चाफा फुले
माडाच्या सांदीला, झाडाच्या फांदीला, इवला खोपा झुले
बोलतो कोकिळ त्याच्या ग मंजुळ तोंडाला नाही थारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणंचुरा
गंधीत धुंदीत सायली-चमेली, लाजरी लाजेची पोर
पळस, पांगारा, पिंपळ पसारा जिवाला लावतो घोर
घंटेचा निनाद घालुनिया साद सांगतो जा पोरी घरा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणंचुरा