Svatantryadin Mhanje Kaay re Bhau

स्वातंत्र्य दिन म्हणजे काय रे भाऊ???

सं म्हणतात की आपल्याला कुणी लुबाडावं? आणि आपण कुणाचे गुलाम असावे? हे ठरवण्याचा हक्क आपण मिळवला, त्या गोष्टीला आज ६५ वर्षे झाली. त्याआधी ब्रिटीश सरकारची सत्ता होती. पण त्यांचा जुलूम फार होता. इथलं लुटून ते तिथल्या राणीच्या खजिन्यात जमा करत असत. आता परिस्थिती बदलली आहे. तो हक्क त्यांच्याकडून आजच्या दिवशी आपण हिरावून घेतला. आता इथे आपल्याच माणसांची सत्ता आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांनी केलेली लूट ते स्वत:च्या खजिन्यात जमा करु शकतात. या देशातले संपले की देशॊदेशीच्या खजिन्यातही ठेवू शकतात. पण सामान्य माणूस म्हणून आपल्याला याचा राग येत नाही. कारण ते परकीय नाहीत. आपलेच आहेत. आपलाच बांधव कुबेर झाला तर दु:ख कसलं करायचं? ब्रिटीशांच्या आधी या देशात राजे राजवाडे संस्थानिकांची सत्ता होती. ती ब्रिटीशांनंतर संपुष्टात आली. स्वातंत्र्यानंतर आपण ती उरलेली संस्थानंही खालसा केली. कारण संस्थानिक कुणी व्हावं? हे ठरवण्याचा अधिकारही स्वातंत्र्यानंतर सामान्य नागरिकाला देण्यात आला. ही खरचं कौतुकाची बाब आहे. दर पाच वर्षांनी मग नवनवे संस्थानिक निवडले गेले, अन त्यांनी स्वत:च्या कर्तबगारीवर स्वत:ची संस्थानं उभी केली. या कामातली त्यांची गती ही खरंच वाखाणण्याजोगी होती. इथले मसाल्याचे पदार्थ, कापूस, सोने अशा व्यापारी गोष्टी देशाबाहेर नेण्यात धन्यता मानणा-या ब्रिटीशांच्या चार पावले पुढे जाऊन यांनी स्वाभिमान, अस्मिता, निष्ठा यांसारख्या किरकोळ फुटकळ गोष्टीही कोट्यावधींच्या भावात विकल्या. तेव्हा खरंच कौतुकाने उर भरुन आला. स्वातंत्र्यपूर्व काळात मोजकेच सम्राट इतिहासाला ज्ञात होते. पण आज साखरसम्राट, शिक्षणसम्राट, मद्यसम्राट अशी सम्राटांची आणि त्यांच्या साम्राज्यांची यादी लिहून त्यांच्या संपत्तीची मोजदाद करायची झाल्यास आभाळाचा कागद अन समुद्राची शाई केली तरी पुरी पडणार नाही. केवढं हे कर्तुत्व! त्यांच्या या साम्राज्य यज्ञात अनेक सर्वसामान्यांची आहूती पडली. पण परकीयांच्या हातून मरण्यापेक्षा स्वकीयांच्या उत्कर्षाकरता मरण येणे कधीही उत्तमच! त्या काळात जमिनी मिळवण्याकरता होणारी हजारोंची कत्तल नवसम्राटांनी थांबवली. मोजक्याच लोकांचा काटा काढून शेकडो एकर भूखंड मिळवण्याच्या त्यांच्या नव्या पद्धतींमुळे शेकडो देशवासीयांचे प्राण वाचले. आपल्या देशबांधवांची ही कर्तबगारी उत्तरोत्तर अशीच झळाळत राहो. याच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा..!!!!!

साठी उलटली स्वातंत्र्याची ग्लोबल झाला देश
छिन्न मुखवटा लोकशाहीचा विस्कटला गणवेष

केवळ टोप्या आणिक झेंडे गहाण डोकी सारी
ठेचुनिया पुरुषार्थ ओणवी अभिलाषेच्या दारी
पोकळ गप्पा बनेल दावे अन बेगडी आवेश
छिन्न मुखवटा लोकशाहीचा विस्कटला गणवेष

देश विकावा कुठे अन कसा केवळ हिशेब चाले
गणतंत्राची माय निजवण्या उत्सुक दलाल सारे
हपापलेल्या नजरा नाही निष्ठेचा लवलेश
गळे मुखवटा लोकशाहीचा विस्कटला गणवेष

1 reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*