To Maza Maharashtra
तो…माझा महाराष्ट्र!!!
तो रांगडा आहे कणखर आहे अंगभर धगधगत्या इतिहासाच्या त्यागाच्या खुणा मिरवणा-या प्रतापी योद्ध्या सारखा त्याच वेळी हळवा सोशिक कनवाळू ही आहे..तो कधी भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे काठी हाणू माथा म्हणत प्रखर स्वाभिमानी बाप होतो त्याच वेळी विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले म्ह्णणारा कुटंबवत्सल माऊली होतो..गेल्या पन्नास वर्षातली वाढ्ता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा या वेगाने झालेली त्याची प्रगती तमाम विश्वाच्या डोळ्यात भरणारी.त्याच्या या कर्तबगारीला मानाचा मुजरा. तो…माझा महाराष्ट्र!!!
पण पन्नाशी नंतर काही पथ्य प्रकर्षानं पाळावी लागतात तशी ती त्याने पाळावीत.आपुलकीच्या नात्यानी ईतरांची ओझी खांद्यावर घेताना आपला कणा वाकणार तर नाही ना? याची काळजी घ्यावी ,परक्याच्या पोरांसाठी तेलकट तळताना आपलं का॓लेस्ट्रा॓ल वाढुन धमन्या चोंदणार नाहित ना याचा अदमास घ्यावा.किरकोळ जख्मा चिघळुन एखादा अवयव वेगळा करायची वेळ येण्याआधीच त्याची योग्य ती सुश्रुषा काळजी घ्यावी.रक्तात वाढ्णा-या फोफावणा-या भ्रष्टाचाराच्या साखरेवर तातडीची उपाय योजना करावी…खांद्यावर कानामागे बांडगुळासारख्या दिसणा-या गाठी निरुपद्रवी वाटल्या तरी वेळीच छाटाव्यात त्या कधी कर्करोगात बदलतील नेम नाही थोडक्यात जरा कठोर होऊन स्वत:कडे पहावं…कारण उद्या काही बिनसल्यास आम्हाला त्याच्या शिवाय कुणाचाच आधार नाही अन आम्हाला तो हवाय असाच अखंड अभेद्य…तो लेकराची ईतकी कळकळीची विनंती मनावर घेईल ही आशा.
क्या बात! कित्ती नेमक्या शब्दात परखडपणे आणि योग्य उपमा वापरून विचार मांडले आहेस ! वा