Zare Megh Abhali Tevha

झरे मेघ आभाळी तेव्हा

गेल्या पावसातली गोष्ट ! आदल्या रात्री पावसानं मुंबईत थैमान घातलं होतं. साहजिकच ब-याच ठिकाणी पाणी साचल्याच्या ब्रेकींग न्युज टिव्हीवर थैमान घालत होत्या. पण गाण्याचं रेकॉर्डींग असल्याने मला तिथे जाणं भागच होतं. म्हणून निघालो. मंद गतीने वाहणा-या पश्चिम एक्सप्रेस हायवेवरुन सरकताना एका गोष्टीने माझं लक्ष वेधून घेतलं. हायवेशेजारच्या पत्र्याच्या शेडमध्ये पाणी साचल्यामुळे, एका गणपतीच्या कारखानदाराने तिथल्या तब्बल दहा गणेशमूर्ती फूटपाथवर ओळीनं मांडल्या होत्या. अन प्रत्येकावर एक, अशा दहा छत्र्या ही बांधल्या होत्या. पांढ-या शुभ्र प्लॅस्टरमधली ती मूर्ती आणि वर काळी छत्री. त्यामागे दूर जाणारा काळाकुट्ट हायवे. मी फ्रेमचा विचार करु लागलो. पावसाळा सुरु झाला की लोक शक्यतो छत्री सोबत राहील याची काळजी घेतात तसा मी कॅमेरा सोबत राहील याची काळजी घेतो. त्या क्षणीही तो सोबत होताच, पण वेळ नव्हता. त्यामुळे परत येताना तिथे ठरवून उतरलो. आता हायवे मोकळा झाला होता. पावसाची बारीक रिपरिप सुरु होती. तिथे पोचल्यावर एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे ते सगळे गणपती हव्या असलेल्या अँगलने टिपायचे तर मला गुडघ्यावर अथवा जमिनीवर फतकल मारुन बसणं गरजेचं होतं. त्याकरिता मी पाऊस थांबेपर्यंत वाट पहायचं ठरवलं. मग तिथल्याच झाडाखाली उभा राहून लेन्समधून आणखी काही गवसतं का? ते न्याहाळू लागलो.

दूर पलिकडे हायवेच्या कडेला एक काळी होंडासिटी उभी होती. तिचा बॅकलाईट चालू होता. पावसामुळे बंद पडली असावी का? कुणीतरी भरपावसात आपल्या कर्माला दोष देत गेला असावा बिचारा ! स्वानुभव आठवुन मला त्या न पाहिलेल्या माणसाची दया आली.अलीकडे असलेल्या बसस्टॉपवर २ मुलं, ३-४ माणसं थांबली होती. त्यातला एकजण चटकन डोळ्यात भरला. याला दोन कारणं होती. एक म्हणजे तिथे असलेल्या सर्वसामान्य माणसांच्या तुलनेत तो वेगळा वाटत होता. अतिशय रुबाबदार असा ! बसने प्रवास करणा-यांपैकी तर अजिबातच वाटत नव्हता. दुसरं म्हणजे त्याच्या हालचाली अत्यंत सावध आणि वेगळया वाटत होत्या. जणू काही आजुबाजुच्या माणसांचा त्याला अडसर होत होता. तेवढयात बस आली. ती माणसं गेली. तो मात्र तिथेच थांबला. त्याच्या चेह-यावर सुटकेचा निश्वास दिसला. आता त्याच्या हालचाली चपळ झाल्या. त्याने घाईघाईने बॅग उघडली. आतून काही काढणार तोच दुसरी एक बस थांबली. एक बाई उतरली. याने चटकन बॅग बंद केली. आणि साळसूद चेह-याने त्या बाईच्या जाण्याची वाट पाहू लागला. माझ्यातला लेखक जागा झाला. कोण असेल तो? अतिरेकी? त्या बॅगेत बॉम्ब तर नसेल? ती बॅगेतली वस्तु तिथे ठेवून निघून जायचा प्लॅन तर नसेल त्याचा? मी सावध होऊन लेन्स बदलली. ८०-४००ची लेन्स लावून झूम करत त्याच्या थोडा जवळ गेलो. खट खट दोन क्लोज टिपून घेतले, वेळ पडल्यास पोलीसांना देण्याकरता. एव्हाना ती बाई दूर गेली होती. त्याने निर्धास्तपणे पुन्हा बॅग उघडली. आतून काहीतरी वस्तु काढली. दूरवर कुणी नाही याची खात्री करुन घेत थोडा पुढे गेला. कडेला पावसाचं पाणी साचून लहानसं तळं साचलं होतं, तिथे वाकला. मी चपळाईनं ती वस्तु पाहण्याकरता झूम केलं. अन त्याच्या हातातली वस्तु पाहून थक्कच झालो. ती एक कागदाची होडी होती. मी पुन्हा क्लिक केलं. अरेच्चा!! हे म्हणजे माझ्या कवीकल्पनेतलं वास्तवात उतरत होतं. .माझ्यातल्या कवीने हळवं होत माझ्यातल्या लेखकाला मुर्खात काढलं. मी तसाच लांब ढांगा टाकत निघालो अन त्याला गाठलं.

’क्या बात है!!! तुमच्यातलं मूल तुम्ही अजुन जपलंय.फार कमीजणांना जमतं हे म्हणून अभिनंदन !”

तो ओशाळून हसत उठला. आणि म्हणाला, “माझं बालपण पलिकडच्या वस्तीत गेलं. तेव्हा शाळेतून जाताना आम्ही भावंड इथल्या पाण्यात होड्या सोडायचो. बरीच वर्ष झाली. आम्ही इथून गेलो. हायवे रुंद झाला. त्या बैठ्या चाळी गेल्या. ती डबकी नाहीशी झाली. आता मी एका मल्टिनॅशनल कंपनीचा सीईओ आहे. रहेजा टाऊनशीपमध्ये रहातो. पण कालच्या बेफाम पावसानं ब-याच वर्षांनी साचलेलं हे तळं सकाळी जाताना पाहिलं. अनं जुने दिवस डोक्यात पिंगा घालू लागले. सकाळपासून कामातही लक्ष लागेना. त्या दिवसांच्या तंद्रीत इतका हरवलो, की समोर आलेल्या डेली रिपोर्ट्च्या कागदाची नकळत होडी बनवली. भानावर आलो त्या क्षणी वाटलं फार झालं ! हीच ती वेळ ! बस्स ! तब्येतीचं कारण करुन ऑफिसमधून निघालो.

मी पाहिलं, पाण्यात ३ होड्या तरंगत होत्या, एक माझी, दुसरी विकासची, माझा भाऊ! तो आता न्युझिलंडला असतो, अन तिसरी नीताची, आमची लहान बहीण! जी अबुधाबीला सेटल झाली आहे लग्नानंतर.” स्वत:शीच बोलल्यासारखा तो बोलत होता. ’रात्री चॅट करताना सांगेन त्यांना ही गंमत ! पण आता खरंच खूप रिलॅक्स वाटतंय. चला निघतो. सहाची मीटींग गाठायला हवी.’ स्वत:चं कार्ड देत माझा निरोप घेताघेता तो बालपणातून पुन्हा सीइओच्या भूमिकेत शिरला. अन रस्ता पार करुन पलिकड्च्या त्या काळ्या होंडा सीटीत बसून भुर्र्कन नाहिसा देखील झाला. काही दिवसांपुर्वी माझ्या मित्राने माझी

झरे मेघ आभाळी तेव्हा
भान हरपूनी चिंब भिजावे
थेंबांचे इवलाले मोती
तळहातावर झेलून घ्यावे

झरे मेघ आभाळी तेव्हा
रंगांच्या रानात शिरावे
ठाईठाईचे हिरवे यौवन
गात्रांमधे भरुन घ्यावे

ही कविता ऐकु विचारलं होतं, ’हे सारं शहरातल्या माणसाला जमत नाही त्याने काय करावं? त्याचं उत्तर याच्या त्या कृतीने दिलं होतं..

झरे मेघ आभाळी तेव्हा
क्षणभर अपुले वय विसरावे
नाव कागदी घेऊन हाती
खुशाल डबक्याकाठी रमावे !!!!

4 replies
  1. Shilpa Sinha
    Shilpa Sinha says:

    कमाल लिहिलं आहे तुम्ही, , ह्या युगात जन्मल्याचे सार्थक झाले माझे
    खरंच जे क्षण येतात हातात त्यांना जगून घ्यावे,
    मस्त पावसात भिजून घ्यावे
    नकळत स्वतःला हरवून द्यावे….

    Reply
  2. Shilpa Khare
    Shilpa Khare says:

    गुरु तू खरंच जातिवंत कलाकार आहेस…..किती बारीक सारीक गोष्टी टिपत असतोस!
    समर्थांनी म्हटल्या प्रमाणे ‘सावधपण मज दे रे राम ‘ त्या माणसाच्या हालचाली पाहून आधी सावध झालास…एका सुजाण नागरिकासारखा… फोटो काढलेस वेळ पडली तर पोलिसात द्यायला….
    तुझ्या संयमाची सुद्धा दाद दिली पाहिजे की तो माणूस पुढे काय करतो हे पाहत राहिलास…
    त्याच्या हातातील कागदाची होडी पाहून , त्याने स्वत:मधील मूल जपलं आहे हे तुझ्या कविमनाला जाणवलं….अजून कुणी तुझ्या जागी असतं तर त्या माणसाला वेड्यात काढंल असतं…. पण तू त्याच्या त्या निरागस वेडेपणाच कौतुक केलं…
    तुझी कविता सुरेखच….शेवटचं कडवं विशेष भावलं

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*