Bhook
भूक…
(Click here for English version)
भूक हि एकमेव भावना प्राणी जन्माला येताना सोबत घेऊन येत असावा. त्यामुळे त्याचा पहिला टाहो हा केवळ भुकेकरता असतो.
पण मानवाचं काय?
हो मनवाचं तेच पण केवळ एका भुकेमुळे तो इतर कोणत्याही प्राण्या पेक्शा अधीक हिंस्त्र होतो.
भुकेमुळै???
तेच तर सांगतोय, मुळात आकलन येई पर्यंत तो देखील कुठल्याही इतर जिवा सारखाच उदरीच्या भुकेभोवती फिरणारा. रूढार्थाने मानव होण्याची प्रक्रिया पुढे घडत जाते, तसतशी पंचेंद्रिये देखील फोफावत जातात. त्यांच्यासोबतीने भूकहि फोफावत रहाते अन प्रत्येक इंद्रियाच्या शेजेला जाऊन बसते. इतर प्राण्यांची भूक ही केवळ उदरापुरती मर्यादित असते, पण मानवाला बुद्धी नावाचं एक अजब अस्त्र निसर्गाने बहाल करुन त्याचा उत्कर्ष आणि विनाश दोन्हीची सोय करुन टाकली. त्याची भूक या बुद्धीच्या तळाशी जाउन बसते. बसते अन तिथून त्याच्या रिपुंवर स्वार होते. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर.. प्रत्येक रिपू तिच्या कचाट्यात सापडतो. त्या मुळे त्याचा भुके पासून भुकेपर्यंतचा प्रवास सुरूच रहातो..
बापरे , हे कुठवर सुरु रहातं??
आयुष्याच्या समिधा सरेपर्यंत हा होम सुरूच रहातो ..
यावर मात करणारे असतीलच की..ठरवून नाही का मात करता येणार?
कठीण आहे, स्वतःला स्वयंभू समजणाऱ्या सर्वज्ञलाही भूक जेव्हा कवेत घेते तेव्हा त्याचं कळसूत्र होतं ..तिच्या सहस्त्र जिभांनी ती मागत रहाते त्याला नाचवत रहाते. मुळात ती आपल्याला नाचवतेय हेच लक्षात येत नाही. गरजे पल्याड गोळा करणारी माणसं पाहिलीस का अवती भवती??? साध्या करता वेळच रहात नाही त्यांच्या पाशी. उभं आयुष्या केवळ साधनं गोळा करण्यातच घालवतात. त्या करता सर्वस्व पणाला लावतात. त्त्याना यात काही वावगं वाटत नाही, कारण बुद्धीचा ताबा घेतलेली भूक त्यांच्यावर आरुढ असते. त्या मुळे ते याला यश समजतात. अन अधीक यशाच्या मागे लागतात. तोंडाला फेस येईस्तो पळतात ..अन संपून जातात त्याच साधनांच्या ढिगाऱ्यावर.
त्यांना यशाचा अर्थ समजवायला हवा.
ते कठीण आहे. यशाचा अर्थ असा नसतोच. ती व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे. ज्यानी समाधानाची व्याख्या समजून घेतलीय त्याना ठाऊक असतं यश अन अपयश एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. असो तो वेगळा विषय आहे. आपण भुके बद्दल बोलत होतो…
हम्म..थोडक्यात भूक नाकारता येत नाही
खरंय, तिचं हे वास्तव आदिम काळापासून मानवाच्या पिढ्यांनी स्वीकारलंय म्हणून तर मानवाचे सारे सोहळे सारे विधी कुठल्या ना कुठल्या भुके भोवतीच बांधले गेलेयत. नीट अभ्यासून पहा. त्यांना नावं निरनिराळी पण खोलात जाऊन पाहिलं तर लक्षात येईल कि त्या त्या वेळी कुणाच्या तरी भुकेतून त्या विधींचा जन्म झाला. भूका भागत राहिल्या तसतसे ते विधी पिढयांना डसत गेले. आता ते कालातीत आहेत आणि रहाणार कारण भुकेला अंत नाही. भूक मग ती कुठलीही असो अनावर होते तेव्हा भितीवरही मात करते त्यामुळे भुकेला भीतीचं अन नीतीचं कुंपण घालता येत नाही…
ती अनावर होऊ नये म्हणून काही???
एकदा भुकेचा वाडगा समाधानानं विसळून पहा
त्याकरता समाधानाचा शोध घ्यावा लागेल नाही का?
पलिकडुन उत्तर आलंच नाही..प्रश्न अनुत्तरीतच राहीला.. “उत्तर शोधायला हवं…कासाविस पणे स्वत:शिच बोलला” ही त्याच्या बुद्धीची भूक होती.
-गुरू ठाकूर
गुरु , “भूक” हे चिंतन मी किती वेळा वाचलं असेल मी आता count विसरले आहे, पण प्रत्येक वेळी मला नवीन काहीतरी मिळालं. मनाचे श्लोक वाचताना असं होत माझं.
तुझ हे चिंतनपर लिखाण दासबोधातील गुरुशिष्य संवादाचा प्रत्यय देऊन गेलं.
”
“भूकेला निती आणि भीतीच कुंपण नसत” हे वाक्य मनाला स्पर्शून गेल…
दासबोध आणि गाथा कोळून प्यायलेला तुझ्यासारखा माणूसच असं आत्मस्पर्शी लिहू शकतो.
भूक जेव्हा बुद्धीला नाचवते तेव्हा पतन, आणि बुद्धी जेव्हा भूकेला खेळवते तेव्हा उत्कर्ष…..सवतीच जणु….. बुद्धी थोरली आणि भूक धाकली…एवढं वळायला हवं
Reality
ह्यात आधी पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली…
Thank you. Stay blessed
भूक माणसाला जागवते, नादवते, हुंदडवते,
भूकच समाधानाच्या पाठिमागे लपते.
तीच माणसाला खुळावते,
सगळ्या जाणिवांत श्रेष्ठ म्हणून…
माणसाला स्वत: पासून दूर नेऊन.
स्वत: चाच शोध घ्यायला भाग पाडते.
थोडी उदाहरणे आल्यास विचार अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होतील आणि अधिक स्वारस्यपूर्णही !
चिंतन, बदल करून, परत अपलोड केलं आहे.
काटा आला अंगावर वाचून.. पण वास्तव हेच आहे.